‘सारथी’कडे दुर्लक्ष

संदीप घिसे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

जर तक्रारीचे निराकरण न करता त्या परस्पर बंद झाल्यास ती तक्रार पुन्हा ओपन करता येईल यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. आजसुद्धा तक्रारीचे निराकरण न करता ती बंद केली असेल तर सारथी कॉल सेंटरवर अशा प्रकारे तक्रार पुन्हा ओपन करता येण्याची सुविधा आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त

पिंपरी - नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता यावी आणि त्या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी ‘सारथी’ ही हेल्पलाइन सुरू केली. मात्र महापालिकेचे अधिकारी ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असून, त्या परस्पर बंद करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे ‘सारथी’चा उद्देश पुरता फसला आहे. 

महापालिकेचे तत्कालीन आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २०१३ मध्ये ‘सारथी’ हा उपक्रम सुरू झाला. देशपातळीवर ‘सारथी’चे कौतुक झाल्यावर ही हेल्पलाइन देशातील सर्व महापालिकां-मध्ये राबविण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने काढले. यामुळे पिंपरी-चिंचवडची सारथी ही देशाची ‘सारथी’ झाली. 

परदेशी हे आयुक्त असताना विभागप्रमुखांच्या बैठकीत ‘सारथी’बाबत आढावा घेत असत. ‘सारथी’वर आलेली तक्रार वेळेत न सोडविल्यास अंकांद्वारे मूल्यमापन करण्यास सुरवात केली; तसेच जादा अंक झाल्यास कारणे दाखवा नोटीस आणि खातेनिहाय चौकशीचीही तरतूद केली. मात्र परदेशी यांची बदली झाल्यावर महापालिका अधिकाऱ्यांनी ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत ती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. विद्यमान आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सुरवातीला ‘सारथी’कडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. मात्र आजही अनेक तक्रारी अधिकारी परस्पर बंद करीत असल्याचे दिसून येते.

अशी होते तक्रार बंद
एखाद्या नागरिकाने सांडपाण्याबाबत ‘सारथी’वर तक्रार केल्यास ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविली जाते. अधिकारी ती तक्रार ठेकेदाराकडे पाठवून देतो आणि तक्रार बंद करतो. मात्र ठेकेदाराने काम केले अथवा नाही, याकडे तो अधिकारी लक्ष देत नाही.

नागरिक म्हणतात...
आदिनाथनगर, भोसरी येथील डबक्‍याबाबत २६ जुलै रोजी ‘सारथी’वर तक्रार केली होती. मात्र तक्रारीचे निरसन न करता ती ३० जुलै रोजी बंद करण्यात आली.
- शिवराम वाडेकर  

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील ॲक्‍सिस बॅंकेच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याजवळ महापालिकेने खोदकाम केले. आता या ठिकाणी सांडपाणी साचत असल्याने दुर्गंधी तर येतेच; परंतु डासांचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही.
- शशिकांत, चिंचवड

तानाजीनगर, चिंचवड येथील आमच्या सोसायटीने गोळा केलेला कचरा दिवसभर महापालिकेची गाडी न आल्याने तसाच पडून राहतो. याबाबत सारथीवर वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही.
- सुनीता वाणी

कुणाल आयकॉन रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत ‘सारथी’च्या पोर्टलवर तक्रार केली; परंतु या तक्रारीचे निराकरण न करता ती बंद केली. फेरीवाल्यांना सांगायला जावे तर ते सुरी हातात घेतात. जर प्रशासनाला फेरीवाल्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर पदपथावरच दुकाने बांधून द्यावीत.
- कैलास टिळे, अध्यक्ष, रोजलॅंड सोसायटी