‘जीएसटी’चा परिणाम क्रीडा साहित्य महाग 

सागर शिंगटे
शनिवार, 15 जुलै 2017

पिंपरी - केंद्र सरकारकडून चालू महिन्यापासून १२ आणि २८ टक्के इतका जीएसटी कर लागू होण्याची अपेक्षा असल्याने काही अपवाद वगळता निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा साहित्यांचे भाव वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. त्याचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर होण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी - केंद्र सरकारकडून चालू महिन्यापासून १२ आणि २८ टक्के इतका जीएसटी कर लागू होण्याची अपेक्षा असल्याने काही अपवाद वगळता निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा साहित्यांचे भाव वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. त्याचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर होण्याची शक्‍यता आहे. 

शहरात दरवर्षी शाळा, महाविद्यालयांकडून एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा साहित्यांची खरेदी केली जाते. तर काही पालक खेळाडूंसाठी थेट क्रीडा साहित्य आणि क्रीडा गणवेशाची खरेदी करतात. शहरात प्रत्येक वर्षी शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांसह इतरही अनेक स्पर्धा होत असतात. त्यांच्यासाठीदेखील क्रीडा साहित्य, गणवेशांची खरेदी होते. मात्र, चालू महिन्यांपासून केंद्र सरकारने विविध क्रीडा साहित्य आणि गणवेशांवर जीएसटी लावल्याने ते महाग होण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहर ॲथलेटिक्‍स संघटनेचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘शाळा, महाविद्यालयांकडून दरवर्षी गरजेनुसार किमान दहा हजार ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत क्रीडा साहित्य खरेदी केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने फुटबॉल, व्हॉलिबॉल, हॅन्डबॉल, बास्केटबॉल तसेच ॲथलेटिक्‍समधील क्रीडा साहित्याचाही समावेश असतो. शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचेही तास होत असतात. त्यांच्यासाठी या साहित्याची गरज असते. काही शाळांकडून इनडोअर खेळांचेही साहित्य खरेदी केले जाते. ‘जीएसटी’मुळे त्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.’’ 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय)चे पिंपरी चिंचवड शाखेचे प्रमुख सुहास वर्दी म्हणाले, ‘‘क्रीडा साहित्यावर पूर्वी पाच आणि  १२.५ टक्के व्हॅट लागू होता. आता त्याऐवजी जीएसटी लागू होईल. त्यामुळे काही अपवाद वगळता क्रीडा साहित्यांचे भाव थोडे-फार वाढण्याची शक्‍यता आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्‍यक साहित्यावर २८ टक्के आणि इतर प्रकारच्या साहित्यावर १२ टक्‍क्‍यांचा ‘जीएसटी’ लागू केला आहे. क्रीडा गणवेशाबाबत अजून स्पष्टता नाही. ’’

साहित्य परत घेणार नाही
जीएसटी लागू झाल्याने सर्व क्रीडा साहित्य आणि गणवेश विक्रेते दुकानदार त्याची ‘सीए’मार्फत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे, त्यांना अजून बऱ्याच साहित्यावरील जीएसटीबद्दल स्पष्टता नाही. चालू महिन्याअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे, काही दुकानदारांनी स्वतःकडील विक्री केलेले साहित्य परत घेतले जाणार नाही, अशी सूचनाही दुकानात लावली आहे.