फेरीवाल्यांना जागा भाड्याने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

भोसरी-आळंदी रस्त्यावर दुकानदारांचा व्‍यापार; पादचाऱ्यांचे हाल, कोंडीत भर

पिंपरी - भोसरी- आळंदी रोडवरील काही दुकानदार आपल्या दुकानासमोर असलेली पदपथाची जागा फेरीवाल्यांना भाड्याने देत आहेत, तर काही ठिकाणी आपल्या दुकानातील सामान पदपथावर ठेवत आहेत. यामुळे ‘गेला पदपथ कुणीकडे?’ असे म्हणण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.

भोसरी-आळंदी रस्त्यावर दुकानदारांचा व्‍यापार; पादचाऱ्यांचे हाल, कोंडीत भर

पिंपरी - भोसरी- आळंदी रोडवरील काही दुकानदार आपल्या दुकानासमोर असलेली पदपथाची जागा फेरीवाल्यांना भाड्याने देत आहेत, तर काही ठिकाणी आपल्या दुकानातील सामान पदपथावर ठेवत आहेत. यामुळे ‘गेला पदपथ कुणीकडे?’ असे म्हणण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.

आळंदी, चऱ्होली या भागाचा झपाट्याने विकास होत चालला आहे. त्यासोबतच भोसरीचाही विस्तार होत आहे. गावठाणापासून थोड्या अंतरावर कमी भाड्यात खोल्या उपलब्ध होत असल्याने कामगारवस्ती वाढत चालली आहे. या भागात कपडे, भांडी, किराणा यासह अनेक प्रकारची दुकाने आहेत. यामुळे भोसरी- आळंदी रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो.

फेरीवाल्यांना जागा भाड्याने
काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील चार फुटाच्या पदपथावरील जागा दरमहा दीड ते दोन हजार रुपये भाडेतत्त्वावर फेरीवाल्यांना दिली आहे. फेरीवाल्यांनी पदपथावरच दुकाने थाटल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. काही भांडी आणि इलेक्‍ट्रिक वस्तू विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकानातील सामान मांडले आहे.

म्हणून होते वाहतूक कोंडी  
रस्त्याच्या दुतर्फा होणारी दुचाकी पार्किंग आणि त्यानंतर काही मोटारचालकही आपली वाहने उभी करतात. अनेकदा दुकानामध्ये माल देण्यासाठी आलेले टेम्पो देखील रस्त्यावरच उभे केले जातात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. रात्री नऊ वाजल्यानंतरच टेम्पोतून माल आणा, असे आवाहन वारंवार वाहतूक पोलिसांच्यावतीने दुकानदारांना केले जाते. मात्र बहुतांशवेळा पोलिसांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

मंगल कार्यालयेही वाहतूक कोंडीस जबाबदार
भोसरी- आळंदी रस्त्यावर काही मंगल कार्यालये आहेत. या कार्यालयांत होणाऱ्या लग्नाच्यावेळी परवानगी नसतानाही नवरदेवाची वरात काढली जाते. अशावेळी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव आल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. याशिवाय लग्नासाठी आलेले अनेकजण रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात. अशावेळी वाहनचालकांना तास्‌नतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते, तर वेळेत बस न आल्याने अनेक फेऱ्याही पीएमपीएमएलला रद्द कराव्या लागतात.

भौगोलिकदृष्ट्या ई प्रभागाचे क्षेत्रफळ मोठे आहे. आळंदी रोड अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. प्रभागात हॉकर्स झोनसाठी १२५० जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष जागेवर ७५० जण आढळून आले आहेत. यापैकी ५०० जणांना प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. लवकरच त्यांना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित केल्यावर येथील पदपथ रिकामे होतील.
- चंद्रकांत इंदलकर, ई क्षेत्रीय अधिकारी