‘एचए’च्या जमिनीसाठी प्राप्तिकर खात्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

एचए कंपनीची २५ एकर जमीन खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी प्राप्तिकर खात्याचे कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याची या खात्याची योजना आहे. सध्या प्राप्तिकर खात्याची कार्यालये शहराच्या विविध भागांमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डीमध्ये तर पुण्यात साधू वासवानी रोड, सॅलिसबरी पार्क, स्वारगेट आणि प्रभात रोड या ठिकाणी प्राप्तिकराची कार्यालये आहेत. एचए कंपनीची जागा मिळाल्यास सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत राहतील. याखेरीज नागरिकांसाठी आवश्‍यक असणारे सुविधा केंद्र त्या ठिकाणी उभी करणे शक्‍य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जागा उपलब्ध करून देण्याबाबत काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्‍तांशीदेखील पत्रव्यवहार करून त्याबाबत सविस्तर चर्चाही झालेली आहे. एचए कंपनीने लिलावात काढलेल्या ८७ एकर जमिनीची खरेदी फक्‍त सरकारी उपक्रम आणि सरकारी कंपन्यांनाच करता येणार असल्याची अट आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याला त्याचा फायदा मिळू शकतो. 

महापालिकेचीही तयारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही ‘एचए’ची ५९ एकर जागा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यावर आरक्षण टाकण्यासाठी २० जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला आहे. जागेच्या बदल्यात कंपनीला विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. प्राप्तिकर खाते आणि महापालिकेशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या अन्य काही विभागांनीही एचए कंपनीच्या जागेत स्वारस्य दाखविले आहे. कंपनीच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया साधारणतः सहा महिने चालणार आहे. त्यानंतर यामध्ये कोणत्या सरकारी यंत्रणांनी अर्ज भरला आहे, याची माहिती मिळणार आहे.