निमंत्रण द्या ‘डिजिटल’द्वारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

युवा उद्योजक चिन्मय कवी यांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव

युवा उद्योजक चिन्मय कवी यांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी तब्बल १७ लाख ३५ हजार रुपये खर्च करते. एकीकडे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला जातो. तर त्यांची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका अद्याप जुन्याच निमंत्रण पत्रिका छपाईची पद्धत वापरते. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ई-व्हॉट्‌सअप आणि मोबाइलच्या माध्यमातून आमंत्रण देण्याची प्रथा सुरू करून केंद्राचे डिजिटलचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करण्याचा प्रस्ताव युवा उद्योजक चिन्मय कवी याने महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे. 

महापालिकेकडून आयोजित करीत असलेले विविध महोत्सव, विकासकामांच्या उद्‌घाटनाचे कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिकेची छपाई करण्यात येते. महापालिकेतील १२८ नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्या दिल्या जातात. निमंत्रण पत्रिका आकर्षित करण्यासाठी त्यासाठी फोर कलरचा वापर करण्यात येतो, यासाठी येणारा खर्च लाखोंच्या घरात जातो. निमंत्रण पत्रिकांची छपाई न करता ही सर्व निमंत्रणे डिजिटल पद्धतीचा वापर करून दिली तर खर्च होणाऱ्या लाखो रुपयांचा उपयोग अन्यत्र विकासकामांसाठी केला जाऊ शकतो, असे कवी यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. 

महापालिकेचे प्रत्येक वर्षाला साधारणपणे सव्वाशेच्या आसपास कार्यक्रम होतात. त्यासाठी छापण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकांचा खर्च २५ लाखांच्या घरात जातो. प्रत्येक वर्षी खर्च वाढत आहे, ही प्रथा पूर्णपणे बंद करण्यात यावी, असे कवी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनही दरवर्षी निमंत्रण पत्रिकांची छपाई करण्यावर साधारणपणे १७ कोटी रुपये खर्च होतात. महापालिका आयुक्‍तांना सुचवलेली डिजिटल सुविधेची संकल्पना तिथेही राबवण्यात यावी, या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहे. निमंत्रण पत्रिकांच्या छपाईवर खर्च होणारे कोट्यावधी रुपये अन्य कामासाठी वापरता येणार असल्याचे कवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.