पालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पिंपरी - अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून, प्रभाग कार्यालयांतही यंत्रणा सज्ज आहे.

पवना व मुळशी धरण भरल्यानंतर विसर्ग केला जातो. यामुळे नदीकिनारच्या वस्त्यांत पाणी शिरते. अशा वेळी पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष प्रभाग कार्यालयांना मदतीबाबत सूचना करते. सहा क्षेत्रीय कार्यालयांत पूरनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. क्षेत्रीय अधिकारी कक्षप्रमुख आहेत. येथे तीन पाळ्यांत कर्मचारी नियुक्‍त आहेत. पूरग्रस्तांना सूचित करण्यासाठी मेगाफोन व रिक्षांवर ध्वनिक्षेपकही सज्ज ठेवले आहेत.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक विभागही सज्ज असून त्यांनी रबर बोट, मोठी दोरी, जवानांची पथके तयार ठेवली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवना व मुळशी धरण येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात राहतील. आपत्ती निवारण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार केला आहे. पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या भागातील नागरिकांचे संपर्क क्रमांकही यंदा महापालिकेने घेतले आहेत. दापोडी, जुनी सांगवी, पिंपरी संजय गांधीनगर, सुभाषनगर, चिंचवड मोरया गोसावी मंदिर परिसर आदी भाग दरवर्षी पाण्याखाली जातो. पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना निवास, भोजन व पाणी आदी सुविधा पुरविल्या जातात.