लाखोंच्या महसुलावर पालिकेकडून पाणी

लाखोंच्या महसुलावर पालिकेकडून पाणी

पिंपरी - पुनर्वसनानंतरही पत्राशेड कायम, फेरीवाल्यांकरिता ओटे बांधूनही भाडेवसुली नाही, मोकळ्या जागी भंगार आणि प्लॅस्टिक वेचकांची गोदामे, अस्वच्छता आणि महापालिकेच्या इंच-इंच जागेसाठी लढणाऱ्या फेरीवाल्यांच्या जागेवर आणि महसुलावर महापालिकेने अक्षरशः पाणी सोडले आहे.

शहरातील नागरिकांना भाजी, फळे, कपड्यांपासून ते अगदी मोबाईल, एसी, फ्रिजपर्यंतची खरेदी करायची कुठे? असा प्रश्‍न विचारला तर पहिले नाव पिंपरी बाजारपेठेचे येते. त्यातही पिंपरी उड्डाण पुलालगतच्या भागातील जागेला सोन्याचे भाव आले आहेत. येथील फेरीवाल्यांना फुकटात मिळालेली एक इंचही जागा ते इतरांना द्यायला तयार नसतात.

मनपाचे गाळे पडून
पिंपरी भाजी मंडईजवळ उड्डाण पुलाखाली महापालिकेने ३७ गाळे उभारले आहेत. मात्र, नियोजन चुकल्यामुळे २६ गाळे बंद आहेत. 

अंधारात गुन्हेगारी
महापालिकेच्या गाळ्यात दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या अंधारात अल्पवयीन मुलीचा खून झाला. अंधार दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रोमी संधू यांनी स्वखर्चातून विजेच्या दिव्यांची व्यवस्था केली आहे. 


नागरिक म्हणतात...
पुनर्वसन झालेल्यांना त्यांच्या हक्‍काच्या घरात पाठवावे. रिक्‍त झालेल्या जागेवर छोटीशी बाग किंवा मूलभूत सोयी-सुविधा द्याव्यात.
- सेवक कांबळे
 

फेरीवाल्यांचे हॉकर्सझोनमध्ये पुनर्वसन करावे. बहुमजली पार्किंग उभारल्यास अनेक प्रश्‍न सुटतील. अग्निशामक दलासही जागा द्यावी.
- विजय शिंदे 
 

समस्या
* नियोजनाअभावी अनेक गाळे पडून
* फेरीवाल्यांकडून मोक्‍याची जागा हडप
* अग्निशामक बंब जाण्यासाठी जागा नाही
* पुनर्वसनानंतरही पत्राशेडमध्ये वास्तव्य
* वाहनचालकांकडून बेशिस्त पार्किंग

उपाययोजना
* सुनियोजितपणे गाळ्यांचा विकास करणे
* मंडईशेजारी बहुमजली पार्किंग उभारणे
* पत्राशेडची जागा खाली करून विकास करणे
* बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी
* रहदारीस अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी

काय आहे वस्‍तुस्‍थिती?...
 महापालिकेने बांधून दिलेल्या ओट्यांचे फेरीवाल्यांकडून भाडे आकारणी नाही
 शगुन चौकाच्या बाजूने पुलाखाली शटर लावून अनधिकृतपणे थाटलेली पक्‍की दुकाने
 शगुन चौकाकडील बाजूस खासगी प्रसूतिगृह आणि पाच मजली इमारत 
 अरुंद रस्ता व पार्किंगमुळे अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, साधी मोटारही जाऊ शकत नाही 
 भीमनगरसमोरील बाजूस पुलाखाली पत्राशेड उभारून अनेक कुटुंबाचा रहिवास
 पत्राशेडमधील बहुतांश कुटुंबांचे पुनर्वसन, तरीही पत्राशेडमधील घरांचा ताबा कायम
 मोरवाडीच्या दिशेने पुलाखाली आरोग्य विभागाचे कार्यालय, बाजूलाच साचलेले डबके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com