पूर्वसूचना न देताच महापालिकेची शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पिंपरी - पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ३९ शाळांचे एकत्रीकरण करून १९ शाळा बंद केल्या. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा महापालिकेच्या उरो रुग्णालय शाळा क्र. १००ला कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारपासून (ता. २५) शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी विद्यार्थी, पालक व शिक्षक धास्तावले आहेत. शाळा अचानक बंद झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर दुसरी शाळा शोधण्याची वेळ आली आहे. 

नवी सांगवीतील औंध उरो रुग्णालय महापालिका शाळा क्र. १०० मध्ये पहिली ते सातवीमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी शिकत आहेत. जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अभ्यासक्रमही बहुतांश शिकवून झाला आहे. सर्व काही सुरळीत असताना शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच शाळा बंद करण्याचे आदेश देऊन या विद्यार्थ्यांना नजीकच्या बा. रा. घोलप शाळेत जाण्यास सांगण्यात आले. मात्र, बा. रा. घोलप शाळेत हे ६० विद्यार्थी अतिरिक्त ठरणार असून विद्यार्थ्यांच्या तुलनेत वर्गखोल्या कमी पडणार आहेत. दरम्यान, पालकांनी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवाहन केले आहे. 

याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्षाच्या मध्यात शाळा बंदचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करणे गरजेचे आहे. जूनमध्ये शाळा बंद केली असती तर विद्यार्थ्यांना पर्यायी शाळा उपलब्ध झाली असती.’’ याबाबत पालिकेचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी म्हणाले, ‘‘कमी पटसंख्या असल्याने शाळा बंद केली आहे.’’

महापालिका शिक्षण मंडळाला शाळा बंद करायचीच होती, तर त्याचे आदेश जूनपूर्वीच देणे आवश्‍यक होते. एक दिवस अगोदर शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. किमान या वर्षी तरी शाळा सुरू ठेवावी. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. बा. रा. घोलप शाळा या विद्यार्थ्यांना कसे सामावणार, याचा शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करावा.
- राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Web Title: pimpri pune news municipal school close