निगडी- देहूरोड चौपदरीकरणाचे 'तीनतेरा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. 

पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. 

निगडी- देहूरोड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे, त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी केलेली आहे, तरीही अनेक अवजड वाहनचालक रात्री या मार्गाचा वापर करतात. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याची पूर्णतः वाताहत झालेली आहे. रस्ता उखडला असून, खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे ट्रक, ट्रेलर उभे केलेले असल्याचे आढळले. वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संथगतीने काम सुरू आहे, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

देहूरोड चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरचा उड्डाण पूल अठरा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्‍केच काम झालेले आहे. पुलाचे काम ३१ डिसेंबर २०१७ रोजी सुरू झाले. ३० जून २०१८ पर्यंत कंत्राटदाराला हे काम पूर्ण करायचे आहे. या पुलासाठी ४३ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. देहूरोड येथील गुरुद्वारा ते रेल्वे उड्डाण पूल या दरम्यान रस्त्यावरील उड्डाण पूल असेल. 

निगडी ते देहूरोड मार्गाचे काम करताना रस्ते विकास महामंडळाने सुरक्षा उपाययोजनांचे पालन केलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- मिलिंद गायकवाड, व्यावसायिक 

निगडी- देहूरोड मार्गाचे काम टप्प्याटप्प्यांऐवजी एकाच वेळेस सुरू केल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक लावणे आवश्‍यक आहे.
- अरुण वैद्य, संगणकतज्ज्ञ