...तर राजकारणातून संन्यास घेतो - काळजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पिंपरी - ‘‘पिंपरी- चिंचवडकरांच्या पाणीप्रश्नाबाबत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संवेदनशीलपणे निर्णय घेत आहेत. ‘टॅंकर लॉबी’ अथवा माझ्या स्वतःच्या मालकीचे किती टॅंकर आहेत, हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी जाहीर करावे. शहरात माझ्या मालकीचा एक जरी व्यावसायिक टॅंकर सापडला, तर राजकारणातून संन्यास घेतो,’’ असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी दिले.

‘शहरात टॅंकर लॉबी सक्रिय आहे, त्याला खतपाणी घालण्यासाठीच महापौर काळजे आणि महापालिका प्रशासनाने शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट भागात मोठ्या प्रमाणात पाणी टॅंकर सुरू आहेत. विशेष म्हणजे, महापौर नितीन काळजे यांचेसुद्धा काही भागांत टॅंकर सुरू आहेत,’ अशी टीका शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी केली होती, त्याला महापौर काळजे यांनी प्रत्युत्तर दिले.

काळजे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या कथित नेत्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघात सपशेल अपयश आले आहे. निवडणुकीत झालेला दारुण पराभव उबाळे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या निर्णयावर बाष्कळ आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या शहरातील नागरिकांनी भाजपला निर्विवाद सत्ता दिली. त्यामुळे नागरिकांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही.’’ 

पायाभूत सुविधांबाबत राजकारण नाहीच...
‘‘शहरातील नागरिकांच्या दृष्टीने पायाभूत सोयी-सुविधा देण्याचे वचन आम्ही निवडणुकीपूर्वी पिंपरी- चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना दिले आहे. प्रशासकीय पातळीवर कितीही तडजोड करावी लागली, तरी नागरिकांना सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही योग्य नियोजन केले आहे. नागरिकांच्या तक्रारी नाहीत. मात्र, विरोधी पक्षातील काही असंतुष्ट लोक बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत,’’ अशा शब्दांत महापौर नितीन काळजे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.