लालफितीत अडकला समांतर पूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी समांतर पूल उभारण्यासाठी सरकारी दफ्तरदिरंगाई कारणीभूत ठरली आहे. नव्या पुलासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनामुळे या कामाला खो बसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी समांतर पूल उभारण्यासाठी सरकारी दफ्तरदिरंगाई कारणीभूत ठरली आहे. नव्या पुलासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनामुळे या कामाला खो बसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हॅरिस पुलावर दोन समांतर पुलांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. या कामाला जानेवारीत सुरवात झाली असून, आतापर्यंत ५५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुलासाठी आवश्‍यक असणाऱ्या खांबांची उभारणी करण्यास वेग घेतला होता. पावसाळ्यामुळे हे काम चार महिने बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, बोपोडीमध्ये पुलासाठी आवश्‍यक असणाऱ्या जागेवर घरे आहेत. ती जागा देण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुणे महापालिकेशी संपर्क साधण्यात आला होता. या प्रश्‍नासंदर्भात दोन बैठकाही झाल्या. मात्र, हा प्रश्‍न अजूनही मार्गी न लागल्यामुळे पुलाचे काम थांबले आहे. बोपोडीमधील जागा ही पुणे महापालिकेच्या हद्दीत येते. त्यामुळे त्यांनी ही जागा ताब्यात दिल्यानंतरच त्याठिकाणी पुलाचे काम सुरू करणे शक्‍य आहे. जोपर्यंत ही जागा ताब्यात येत नाही, तोपर्यंत इथे काम सुरू करणे शक्‍य नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

या कामासाठी २४ कोटी रुपये खर्च होणार असून, ते पूर्ण होण्यास दोन वर्षांचा अवधी लागणार आहे. प्रकल्पासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या किमतीत तूर्तास भाववाढीचा समावेश करण्यात आलेला नाही. भाववाढीचा विचार केला तर या प्रकल्पाच्या खर्चामध्ये १५ ते १६ टक्‍क्‍यांची वाढ होण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही पुलांची लांबी ४०० मीटर लांबी असेल. साडेसात मीटर रुंद असणाऱ्या या पुलावर दोन मीटरचा पदपथ असल्याचे त्यांनी नमूद केले. 

बोपोडीमधील झोपडपट्टीचे पुनर्वसन झाल्याखेरीज ही जागा पुलाच्या उभारणीसाठी मिळणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासंदर्भात पुणे महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी महापालिकेने सातत्याने पाठपुरवठा सुरू आहे. 
- श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

हॅरिस पुलानजीक असणाऱ्या बोपोडीतील झोपडपट्टीधारकांचे पुरावे गोळा करण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यातील पात्र झोपडीधारकांचा ड्रॉ येत्या २० दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे. या झोपडीधारकांनी औंध, वारजे आणि हडपसर या तीन ठिकाणी जागेची मागणी केली आहे. ड्रॉनंतर दीड ते दोन महिन्यांत ही जागा मोकळी होईल. त्यानंतर ती पुलाच्या कामासाठी वर्ग करण्यात येईल. 
- संदीप कदम, सहायक आयुक्‍त, पुणे महापालिका. 

प्रवासी म्हणतात
पिंपरी-चिंचवडमधून निघाल्यानंतर हॅरिस पुलापर्यंत लवकर पोचतो. मात्र, या पुलावरील वाहतूक कोंडीमध्ये तासभर अडकून पडावे लागते. त्यामुळे पुण्यात पोचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याठिकाणी सुरू असणारे समांतर पुलांचे काम तत्काळ मार्गी लावण्याची आवश्‍यकता आहे. 
- रवींद्र पवार

जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर हॅरिस पुलावरच सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असते. येथील वाहतुकीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, पालिका प्रशासन या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने सर्वसामान्यांना हाल होत आहेत.
- आर. गणेश

हॅरिस पुलावरील वाहतूक कोंडी हा अनेक वर्षांचा प्रश्‍न आहे. मात्र, सरकारी यंत्रणा त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. एकीकडे वाहनांची वाढणारी संख्या आणि वाहतूक कोंडी या दोन्हीचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो.
- दिनेश मराठे