मदर तेरेसा की, पंडित दीनदयाळ उपाध्याय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या नामकरणावरून राजकारण
पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना केली होती. आता या पुलाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी केली आहे. यामुळे आगामी काळात या पुलाच्या नामकरणावरून राजकारण होण्याची शक्‍यता आहे.

पाच वर्षांपूर्वी एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. या उड्डाण पुलाला नोबेल पारितोषिक विजेत्या संत मदर तेरेसा यांचे नाव देण्याची घोषणा अजित पवार यांनी यापूर्वीच केली आहे. निवडणुकीच्या काळातही ख्रिस्ती समाजाच्या मेळाव्यात याबाबतचा पुनर्रोच्चार पवार यांनी केला होता. 

त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आहे. एम्पायर इस्टेट हा उड्डाण पूल प्रभाग क्रमांक १९ मधून जातो. यंदाचे वर्ष हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यामुळे या पुलाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नगरसेविका जयश्री गावडे यांनी आयुक्‍तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागणी कितपत योग्य - बहल
याबाबत विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकासकामांचे नामकरण करण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे. भाजपने स्वतः केलेल्या विकासकामांना त्यांनी हवे ते नाव द्यावे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे मोठे आहेतच. मात्र, एम्पायर इस्टेट उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्याचे निश्‍चित झाले असताना, अशी मागणी करणे कितपत योग्य आहे? घोषणा झाल्यानंतर पुन्हा उड्डाण पुलाचे नाव बदलणे कितपत योग्य आहे. आम्हीदेखील याबाबत आयुक्‍तांना निवेदन देणार आहोत.’’