मुख्यमंत्र्यांनी वाढवली ‘धडधड’

मुख्यमंत्र्यांनी वाढवली ‘धडधड’

पिंपरी - होणार... होणार... राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे गेली सहा महिने चर्चाच सुरू आहे. मात्र त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर विस्ताराचे वारे पुन्हा वाहू लागले. त्यामुळे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेक आमदारांना हायसे वाटले. पण याबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणाने शहरातील इच्छुक असणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची मात्र धडधड वाढविली आहे.

मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पहिल्यांदा भाष्य केले. याबाबत त्यांनी जे स्पष्टीकरण दिले त्याने अनेक इच्छुकांचे आणि निष्क्रिय मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नव्हे, तर पुनर्रचना होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर ज्या मंत्र्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना घरचा रस्ता धरावा लागेल हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. या वक्तव्यामुळे इच्छुकांना आपली वर्णी मंत्रिमंडळात लागणार की नाही याची चिंता सतावू लागली आहे.  

पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे कॅबिनेट मंत्रिपद मिळावे किंवा नगरविकास खात्याचे राज्यमंत्रिपद मिळावे, यासाठी आधीपासून प्रयत्नशील आहेत. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे क्रीडा राज्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी दोन्ही आमदारांनी दिल्लीवारी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राच्या भाजप प्रभारी सरोज पांडे आणि इतर नेत्यांना गळ घातली. हे करताना दोघांनी एकमेकांत समन्वयही ठेवला. त्यामुळे दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे हे मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातील सहकारी म्हणून ओळखले जातात. शिवाय ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जुने हाडाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात निवड होईल अशी अटकळ बांधली जात असताना, मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी सगळ्यांची दांडी उडविली आहे. नाही म्हणायला ‘एनडीए’मध्ये सामील झालेले नारायण राणे यांच्यासाठी मंत्रिपदाची कवाडे उघडली असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच नमूद केल्याने त्यांची तगमग काहीशी थांबली आहे. 

आठ-दहा महिन्यांपूर्वी येथील आमदारांना कामाला लावून भाजपने महापालिकेत सत्ता मिळविली. त्या वेळी दोघांनाही मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रिपदाचे गाजर दाखविले होते. दोघांनीही जिवाचे रान करून राष्ट्रवादीची पंधरा वर्षांची सत्ता संपुष्टात आणत महापालिका खेचून आणली. पण आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने दोघांचीही धडधड वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात, की आमदारद्वयांची धडपड व्यर्थ जाते, हे हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेवेळीच दिसणार आहे.

मंत्रिपदासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत, हे खरे आहे. पण मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीवेळी तसा काही शब्द दिला नव्हता. पिंपरी-चिंचवडकडे लक्ष देऊ, असे ते म्हणाले होते. मंत्रिपद द्यायचे की नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. 
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com