प्रश्‍न पाठवा अाणि संसद पाहा - खासदार श्रीरंग बारणे

प्रश्‍न पाठवा अाणि संसद पाहा - खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - देशाची ध्येयधोरणे ठरविताना विद्यार्थ्यांची भूमिका सरकारपर्यंत पोचावी, या उद्देशाने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निश्‍चित करणारा प्रश्‍न विचारायचा आहे. उत्कृष्ट प्रश्‍न विचारणाऱ्यास संसदेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत मावळ मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी प्रश्‍न पाठविण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे. 

या अभिनव उपक्रमाची माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘‘गेल्या साडेतीन वर्षांत पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील व देशभरातील अनेक प्रश्‍न संसदेमध्ये उपस्थित केले आहेत. आतापर्यंत ८४२ प्रश्‍न संसदेमध्ये विचारले असून, २५२ वेळा चर्चेत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर १६ खासगी विधेयके संसदेत सादर केली आहेत.’’

भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांची मते सरकारपर्यंत पोचावीत, विद्यार्थी आणि सरकार यांच्यामधील एक दुवा बनावे, या उद्देशाने या उपक्रमाची सुरवात केली आहे. यामुळे विद्यार्थी देशात कोणते बदल घडवू इच्छितात, त्यांना देशात आणखी नवीन काय करावे वाटते, हे या उपक्रमातून समजणार असून ते सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे. आगामी लोकसभेच्या अधिवेशनात जे प्रश्‍न संसदेत मांडावेत, असे विद्यार्थ्यांना वाटते, ते देशहिताचे व केंद्र सरकारला धोरण ठरविण्यास भाग पाडून आवश्‍यक सुविधा प्राप्त करण्यास मदत मिळेल, असा एक प्रश्‍न मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे, सुवाच्च अक्षरांत लिहून पाठवावा. प्रश्‍न मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत विद्यार्थी पाठवू शकणार आहेत. प्रश्‍न पाठविण्याची मुदत २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत आहे.

मतदारसंघातील प्रत्येक शहरातून पाच विद्यार्थी निवडले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या प्रश्‍नांचा ‘ड्रॉ’ काढला जाईल. त्यामधून उत्कृष्ट प्रश्‍न असलेल्या विद्यार्थ्याला लोकसभेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च श्रीरंग बारणे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे, असेही बारणे यांनी सांगितले.

माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आपला प्रश्‍न लिहून पाठवावा. तसेच appabarne@gmail.com या ई-मेल आयडीवर देखील विद्यार्थी प्रश्‍न पाठवू शकतील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ८३९०५१०१११ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारशी निगडित प्रश्‍न पाठविण्याचे आवाहन बारणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com