विकासकामांमुळे वाहतुकीवर ताण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पिंपरी - जगताप डेअरीतील साई चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे येथील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कस्पटे चौकात हाती घेतलेले रस्ता रुंदीकरणाचे कामही कूर्मगतीने सुरू आहे. येथील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र होत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत आयटीयन्स संतप्त झाले आहेत. 

जगताप डेअरी, साई चौकातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाने संयुक्तरीत्या येथे उड्डाण पूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेतले. ते जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी चौकातील वाहतुकीत बदल केले आहेत. त्यासाठी जगताप डेअरी, कस्पटे चौकामार्गे वाहतूक वळविल्याने विशालनगर रस्ता व सावित्रीबाई फुले उद्यान मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आला. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने कस्पटे चौकालगतच्या (विशालनगर दिशेला) रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत चौक ते न्यू डीपी रोड चौकापर्यंत सपाटीकरण करून खडी अंथरण्यात आली. या रुंदीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न काही अंशी तरी सुटेल, अशी नागरिकांना आशा होती. हे काम सुरू होऊन पंधरा दिवस उलटूनही प्रगती झालेली नाही. महापालिकेने लवकर हे रुंदीकरण करून रस्ता वापरासाठी मोकळा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

अशी आहे अवस्था
साई चौकातील ६० टक्के वाहतूक कस्पटे चौकाकडे वळविल्याने सध्या हा चौक २४ तास वर्दळीचा असतो. या चौकातून जगताप डेअरीकडे जाणारा मार्ग अरुंद म्हणजे अवघा १५ फुटांचा आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी ठरलेलीच. त्यातच साई चौकाकडून येणाऱ्या वाहनास विशालनगरकडे वळताना आवश्‍यक तेवढी जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकदा जीव धोक्‍यात घालून हे वळण घ्यावे लागते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास दहा ते पंधरा फूट अतिरिक्त रस्ता उपलब्ध होईल. त्यातून वाहतुकीच्या अनेक समस्या सुटतील, असे मत अनंत कुंभार यांनी व्यक्त केले.