पिंपरीतील रस्त्यांवर एलईडींचा झगमगाट

LED-Lamp
LED-Lamp

पिंपरी - ऊर्जाबचतीसाठी शहरातील सर्व पथदिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के वीजबचत होऊन वीजबिलाच्या रकमेतही ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होणार आहे. 

ऊर्जाबचत व संवर्धनासाठी शहरातील सोडियम व्हेपर, मेटल हालाईड, सीएफएल व टी-५ प्रकारातील जुने दिवे बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याऐवजी वीजबचत करणारे एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे.

रस्त्यांच्या प्रकारानुसार प्रकाशाचे आवश्‍यक प्रमाण राखण्यासाठी (लक्‍स लेव्हल) योग्य क्षमतेचे एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. त्यासाठी ऊर्जा नियोजन कंपनीने सर्वे केलेला आहे. ही कंपनी सर्वे व पर्यवेक्षणासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहे. त्यांनी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू केले आहे. एलईडी दिवे बसविण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एनर्जी इफिसिएन्सी सर्विस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीसोबत करार केलेला आहे.

त्यानुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ईईएसएल सोबतच करार करावा, असा निर्णय राज्य सरकारने १२ जानेवारी २०१८ रोजी घेतलेला आहे. त्यानुसार महापालिकेने ईईएसएलकडे सविस्तर माहिती पाठविली होती. त्याआधारे ईईएसएलने प्रकल्प प्रस्ताव व करारनाम्याचा मसुदा महापालिकेला पाठविला आहे. जुने पारंपरिक फिटिंग काढून एलईडी फिटिंग बसविण्यात येणार आहे. त्याची विम्यासह सात वर्षांची वॉरंटी कंपनीने घेतलेली आहे.

नवीन यंत्रणेचे फायदे
 मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून दिव्यांचे नियंत्रण करता येणार
 एलईडी दिव्यांची देखभाल-दुरुस्ती ईईएसएल करणार
 देखभाल दुरुस्तीचा खर्च बचतीतील रकमेतून करणार
 इस्को तत्त्वामुळे सुरवातीस महापालिकेला खर्च नाही
 नॅशनल लाईटिंग कोडनुसार दिव्यांचे वॅटेज निश्‍चित करणार

एलईडीबाबतचे धोरण
 एलईडी दिव्यांच्या प्रकाश तीव्रतेचा पाहणी अहवाल करणार
 एलईडी फिटिंग वॉरंटीत देखभाल-दुरुस्ती कालावधी सात वर्षे
 एलईडी फिटिंगच्या ठिकाणी ब्रॅकेट, क्‍लॅम्प, वायरचा समावेश
 दिव्यांच्या पायाभूत सुविधांसाठी अधिकचा खर्च महापालिकेकडे

अशी होईल वीजबचत
 ३८,७५५ एलईडी दिव्यांना ३२७० किलोवॅट वीजवापर, तर ३६,१३४ एलईडी दिव्यांना किती वीजवापर होईल?
 ३६,१३४÷३८,७५५ × ३२७०=३०४८ किलोवॅट. 
 सध्या जुन्या दिव्यांवर ६७९० किलोवॅट वीजवापर होत आहे.
 त्यामुळे जुने दिव्यांचा वीजवापर - संभाव्य एलईडी दिव्यांचा वीज वापर = जादा वीजवापर 
 ६७९०-३०४८=३७४२ किलोवॅट 
 एलईडी दिव्यांमुळे ३७४२ किलोवॅट वीजबचत होईल 
 सध्या महापालिका १०,०६० किलोवॅटला वार्षिक दिवाबत्तीचे वीजबिल २७ कोटी ३९ लाख रुपये भरत आहे. 
 ३७४२ किलोवॅटने वीजबचत झाल्यास वीजबिलात १० कोटी १८ लाख रुपये वार्षिक बचत होईल.

दृष्टिक्षेपात पथदिवे...
शहरातील एकूण दिवे : ७४,८८९. वीजवापर १०.०६ मेगावॅट अर्थात १०,०६० किलोवॅट. 
आतापर्यंत बसवलेले एलईडी : ३८,७५५. वीजवापर ३.२७ मेगावॅट अर्थात ३२७० किलोवॅट. 
सोडियम व्हेपर, टी-५, सीएफएल दिवे (जुने) : ३६,१३४. वीजवापर ६.७९ मेगावॅट अर्थात ६७९० किलोवॅट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com