खासगी बसगाड्यांचे भाडे दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पिंपरी - उन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत खासगी व्यावसायिकांनी बस भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली आहे. विशेष म्हणजे भाडेवाढ केल्यानंतरदेखील या बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. अहमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदा, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, लातूर, अमरावती या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 

पिंपरी - उन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत खासगी व्यावसायिकांनी बस भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली आहे. विशेष म्हणजे भाडेवाढ केल्यानंतरदेखील या बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. अहमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदा, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, लातूर, अमरावती या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 

सरकारी बससेवा मर्यादित ठिकाणी उपलब्ध आहे. रेल्वेने सुटीनिमित्त जादा गाड्या सोडल्या असल्या तरी त्याचेही आरक्षण दोन महिने अगोदरच फुल झाले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांना खासगी बसगाड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी एक हजार ते पंधराशे रुपयांदरम्यान असणारे भाडे किमान ५० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. 

पिंपरी-चिंचवडमधून एसी बसने राजकोटला जाण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये, तर नॉनएसी बसससाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अहमदाबादला जाण्यासाठी एसी बसचा दर अडीच ते तीन हजार, तर नॉनएसी बसचा दर दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. बंगळूरसाठी खासगी बसचे भाडे अडीच हजार रुपयांच्या पुढे आहे. सुरत, बडोदा, नागपूर, लातूर, अमरावती या गाड्यांचे भाडेदेखील एक ते दोन हजाराच्या दरम्यान आहे. सुट्यांचा हंगाम नसतो, त्या वेळी खासगी बसचे दर आटोक्‍यात असतात. सुटीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते, त्यामुळे तिकिटाच्या दरात वाढ होते. मात्र, प्रवाशांसमोर पर्याय नसतो, त्यामुळे त्यांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. 

खासगी बसचालकांनी किती भाडे आकारावे, यासंदर्भात सरकारने नियमावली तयार करण्याची गरज आहे. एसटी महामंडळानेदेखील कोणत्या मार्गावर एसी आणि नॉनएसी बसेसची आवश्‍यकता आहे. याचे सर्वेक्षण करून सुटीच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या मार्गावर बससेवा सुरू करावी. रेल्वेनेदेखील नियोजन करून गरजेनुसार जादा गाड्या सोडाव्यात, असे झाल्यास हा प्रश्‍न काही प्रमाणात मिटेल. 
- संदीप राऊत, संगणक अभियंता.

एसटी महामंडळाने आंतरराज्य पातळीवरील बससेवेत वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या भागातील शहरांचा अभ्यास करून त्यामार्गावर बससेवा सुरू करावी. प्रामुख्याने सुटीच्या कालावधीत या ठिकाणी बसेस सोडाव्यात. तसे झाल्यास प्रवाशांना खासगी बससेवेवर अवलंबून न राहता, त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होईल.
- धवल तपस्वी, विद्यार्थी.

Web Title: private bus rent double