ज्येष्ठांची वयोमर्यादा 60 करणार - राजकुमार बडोले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - ""ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे,'' अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिली. 

पुणे - ""ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे,'' अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिली. 

जनसेवा फाउंडेशनतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंच येथे "आनंद मेळावा' आयोजिला होता. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, माजी आमदार मोहन जोशी, मदन बाफना, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, उद्योजक बहारी मल्होत्रा, कृष्णकुमार गोयल, विजयकांत कोठारी, देविचंद जैन, डॉ. जयसिंह पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, मीना शहा आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या कांचन श्रॉफ यांना "जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लक्ष्मण दिनकर, त्रिंबक केळकर, इंदूबाई नलावडे, शालिनी चिरपुटकर, भुजंगराव कुलकर्णी, डॉ. लीला गोखले, इंदिरा ओगले, लीला काटदरे यांना "शतायुषी' पुरस्कार देण्यात आला. 

बडोले म्हणाले, ""जनसेवा फाउंडेशनने भरविलेल्या आनंद मेळाव्यासारखे कार्यक्रम राज्य सरकारही भरवू शकत नाही, इतके कष्ट ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी घेतले जात आहेत. फाउंडेशनतर्फे समाजातील वृद्ध, अनाथ मुले, अपंग, भिक्षेकऱ्यांची मुले अशा उपेक्षित, दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने काम केले जात आहे. असे काम राज्य सरकारच्या अन्य विभागातही व्हावे, या दृष्टीने संघटनेने प्रयत्न करावेत.'' 

बापट म्हणाले, ""ज्येष्ठ नागरिकांच्या या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी नाही, तर ज्येष्ठांचे दर्शन घेण्यासाठी मी दरवर्षी येतो. येथे आपले आई-वडील भेटल्यासारखे वाटते. "पीएमपी'च्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यासंदर्भातचा विचार सुरू आहे.'' 

कुलकर्णी म्हणाल्या, ""फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे डॉ. शहा ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव केंद्र सरकारकडून "पद्मश्री'ने होण्याची गरज आहे. दरवर्षी या कार्यक्रमातून मला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.'' प्रास्ताविक डॉ. शहा यांनी केले. सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी व जे. पी. देसाई यांनी केले.