'हेच का अच्छे दिन'; अजित पवार यांचा सवाल

मिलिंद संगई
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कर्जमाफीची घोषणा आजही केवळ कागदावर आहे. निव्वळ ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यातच वेळ घालवला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला पाहिजे अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी मांडली. 

बारामती : वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे जगात सर्वाधिक वाढवून ठेवलेले दर, गॅस सिलेंडरच्या किंमतीचा भडका यासह सर्वच आघाड्यांवर केंद्र व राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य माणसासाठी हेच का ते अच्छे दिन असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

आज फेसबुकच्या माध्यमातून देशभरातील हितचिंतकांशी अजित पवार यांनी लाईव्ह संवाद साधला. त्या प्रसंगी विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. वाढत्या महागाईसह इंधन दरवाढ व रखडलेल्या प्रकल्पांबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली, त्याला दुजोरा देत कुठल्याच बाबतीत सरकार ठोस निर्णय घेत नाही हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी टीका त्यांनी केली. 

धनगर आरक्षणाबाबत आजही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, वेळ मारुन नेण्याचे धोरण प्रत्येक ठिकाणी दिसते असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. जागतिक पातळीवर प्रति बॅरलमागे इंधनाचे दर कमी होत असताना देशात इंधन दर कसे वाढत आहेत याचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले. 

कर्जमाफीची घोषणा आजही केवळ कागदावर आहे. निव्वळ ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यातच वेळ घालवला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला पाहिजे अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी मांडली. 

कर्जमाफी, इंधन दरवाढ, महागाईवाढ, मुंबई विद्यापीठांचे निकाल लावण्यात अपयश या सह इतरही अनेक बाबतीत सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी सर्वच  स्तरावरील नागरिकांवर सरकारचा विविध माध्यमातून अन्याय सुरु असल्याची तक्रार अनेकांनी या संवादादरम्यान अजित पवार यांच्याकडे केली, मात्र तुमच्यावर होणारा अन्याय हा मतदानादरम्यान मतपेटीतून दिसायला हवा, मतदान यंत्रावरील बटण दाबताना तुम्ही हा अन्याय लक्षात ठेवायला हवा असा सल्ला अजित पवारांनी या वेळी दिला. 

आगामी सर्वच निवडणूकांदरम्यान राष्ट्रवादी सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे, पक्षसंघटनेत अनेक ठिकाणी फेरबदल वा काही सुधारणा करण्याच्या कार्यकर्त्यांच्या सूचनांची दखल घेतल्याचे सांगत आगामी काळात हे बदल झालेले दिसतील अशी ग्वाही त्यांनी दिली. 
राज्यात झालेल्या चांगल्या पावसाने राष्ट्रवादीच्या काळात केलेल्या बंधा-यात पाणी साचल्याचे काहींनी सांगितल्यानंतर सिंचनाच्या बाबतीत आमचे सरकार आग्रही होते, माझ्यासह अनेकांची यात बदनामी झाली आमच्यावर आरोप झाले पण आज हे पाणी पाहिल्यावर आम्हालाही चांगले काम केल्याचे समाधान वाटते, असे त्यांनी नमूद केले.