सरकारचे पुढचे पाऊल "ई-ग्रंथालय' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - ""राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला हवे,'' असे मत राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी रविवारी व्यक्त केले. 

पुणे - ""राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला हवे,'' असे मत राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी रविवारी व्यक्त केले. 

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि केंद्रीय संदर्भ ग्रंथालय (कोलकता) यांच्या वतीने आयोजित प्रकाशक मेळाव्यात धांडोरे बोलत होते. या वेळी अमरावती येथील पॉप्युलर बुक सेंटरचे प्रमुख, विक्रेते नंदकिशोर बजाज यांचा जीवन गौरव पुरस्काराने, तर चित्रकार-लेखक ल. म. कडू यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ग्रंथालयाच्या मराठी विभागाच्या सहसंपादक वैष्णवी कुलकर्णी, संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित होते. 

धांडोरे म्हणाले, ""मुंबईत गेल्या 10 वर्षांत पुस्तकाचे एकही नवीन दुकान सुरू झाले नाही, अशी माहिती एका सर्वेक्षणानुसार पुढे आली आहे. ही चिंतेची बाब आहे. आपण एकत्रित काही प्रयत्न केले नाहीत, तर हे चित्र सगळीकडेच दिसायला लागेल. वाचन संस्कृती, ग्रंथप्रसार, ग्रंथालय याबाबत सातत्याने बोलले जात आहे. खंत व्यक्त केली जात आहे; पण ज्या गतीने वाचनसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी किंवा ग्रंथप्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत त्या गतीने ते होताना दिसत नाहीत.'' 

प्रकाशक-वितरकांत हवा संवादाचा पूल 
बजाज म्हणाले, ""राज्याच्या सर्व भागात वितरक हवेत; पण सध्या ते नाहीत. त्यामुळे ग्रंथप्रसारात मोठे अडथळे येत आहेत. ते सोडवणे एकट्याचे काम नाही. त्यामुळे प्रकाशक संघटनेने यात लक्ष घालायला हवे; पण बऱ्याचदा प्रकाशक आणि वितरक यांच्यातच संवाद होत नाही. त्यामुळे आधी एकमेकांत संवादाचा पूल बांधला जायला हवा. आपण एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकांस पूरक कसे होऊ, हे पाहायला हवे. आर्थिक लाभाचे हे क्षेत्र नाही. वाचनसंस्कृती वाढवणे हे आपले मुख्य ध्येय आहे.'' 
पराग लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. शशिकला उपाध्ये यांनी आभार मानले. 

केवळ पुण्यातीलच प्रकाशकांना सरकारच्या योजना मिळायला हव्यात असे नाही. राज्याच्या सर्व भागातील, विशेषत: ग्रामीण भागातील प्रकाशक, वितरकापर्यंत आम्ही सरकारच्या योजना पोचवत आहोत. त्यांना योजनांमध्ये सहभागी करून घेत आहोत. 
- किरण धांडोरे, संचालक, ग्रंथालय संचालनालय 

Web Title: pune news E-Library