‘आई, तिला विचार तू का आलीस?’

मीनाक्षी गुरव
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - मध्यरात्री अचानक तनया उठली आणि रडायला लागली. काय झालं, असं मी तिला विचारलं. ती म्हणाली, ‘‘माझी ‘ती’ आई आहे ना! ती येतीयं, तू तिला विचार ती का येतीयं?’’ तिची समजूत काढत मी तिला शांत केलं. अवघ्या साडेसहा वर्षांची तनया हे आत्तापासूनच स्वीकारत असली, तरीही तिच्या येण्याने माझं आयुष्य मात्र परिपूर्ण झाल्याची जाणीव मला नेहमी बळ देते,’’ असे ‘सिंगल पॅरेंट’  असणाऱ्या सोनाली जाधव (नाव बदललेले आहे) यांचे म्हणणे आहे.

तनयाच्या असण्यानंच माझं आयुष्य खऱ्या अर्थाने फुललं आहे. आपण पालक असलो तरीही ‘पालकत्व कसं असावं’, ‘आयुष्य कसं जगावं’, हे तिच्या असण्यामुळेच मला कळतं, असेही सोनाली यांनी अधोरेखित केले. ‘लग्न करायचेच नाही’, हे सोनाली यांनी आधीच ठरविले होते. खरंतर सोनाली आयटी क्षेत्रात कार्यरत असतानाच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. 

लग्न करायचे नाही, हा निर्णय त्यांनी घेतला होता; परंतु त्यांना पालकत्व हवे होते. म्हणून ‘बाय चॉइस’ त्यांनी बाळ दत्तक घेण्याचे ठरविले. ‘एक आई म्हणून मुलीलाच अधिक समजून घेऊ शकेन, असे मला नेहमी वाटायचे म्हणून मुलीलाच दत्तक घेण्याचे ठरविले,’’ असे सोनाली यांनी सांगितले. 

मुलगी दत्तक घेण्यासाठी त्यांनी मे २०१० मध्ये रीतसर अर्ज केला. सोफोश संस्थेत अवघ्या पाच महिन्यांची तन्मयी (नाव बदललेले आहे) १ जुलै २०११ रोजी त्यांच्या घरात आली आणि तन्मयीची तनया (नाव बदललेले आहे) झाली. तिला दत्तक घेणे ही माझी भावनिक गरज होती. तिच्यामुळे आज आयुष्य परिपूर्ण  झाल्याची भावना सोनाली यांनी व्यक्त केली.

‘‘आई मला बाबा का नाहीत?’’, ‘‘ती आई आली तर?’’, असे अनेक प्रश्‍न तिला भंडावून सोडत असले, तरीही त्यांची उत्तरे मिळाल्यानंतर तनया अवघ्या साडेसहा वर्षांतच वस्तुस्थिती स्वीकारत आहे. माझी लेक आयुष्य पूर्ण करते आणि मला पालकत्व कसे असावे, हे शिकविते. तिच्याचमुळे पालकत्व आणि शिक्षण विषयात अभ्यास सुरू केला. माझी लेक माझा अभिमान बनली आहे, असेही सोनाली यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स