उत्पन्न वाढवा; अन्यथा कठोर कारवाई - तुकाराम मुंढे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील एका बसगाडीचे दिवसाकाठचे उत्पन्न १५ हजार रुपये, तर प्रवासी संख्या एक हजार इतकी असावी, हे उद्दिष्ट मांडत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली आहे. उत्पन्न वाढीच्या या उद्दिष्टापासून हात झटकणाऱ्या व्यवस्थापकांवर कठोर कारवाईची सूचना वजा तंबी 

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील एका बसगाडीचे दिवसाकाठचे उत्पन्न १५ हजार रुपये, तर प्रवासी संख्या एक हजार इतकी असावी, हे उद्दिष्ट मांडत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली आहे. उत्पन्न वाढीच्या या उद्दिष्टापासून हात झटकणाऱ्या व्यवस्थापकांवर कठोर कारवाईची सूचना वजा तंबी 
‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी डेपो व्यवस्थापकांना शनिवारी दिली. सेवेचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ न घातल्यास आर्थिक नुकसानीची जबाबदारीही व्यवस्थापकांचीच असेल, असेही मुंढे यांनी बजाविले. ‘पीएमपी’ची सेवा, प्रवासी संख्या आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचा मुंढे यांनी डेपोनिहाय आढावा घेऊन, व्यवस्थापकांना सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने बसगाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, त्यावरील खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याबाबतची वस्तुस्थिती मांडत मुंढे यांनी व्यवस्थापकांना कामकाजात सुधारणा करण्याची सूचना केली. प्रत्येक डेपोकडील मनुष्यबळ, त्यांची कामे आणि परिणामकारकता याचाही आढावा त्यांनी घेतला.

मुंढे म्हणाले, ‘‘प्रवाशांना चांगली सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा परिणाम उत्पन्न वाढीच्या माध्यमातून दिसून येत आहे. मात्र, डेपोच्या पातळीवरही तसे प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र ते होताना दिसत नाहीत. त्याकरिता व्यवस्थापकांनी नियोजन केले पाहिजे. त्याकरिता व्यवस्थापकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच, डेपोकडील उपलब्ध बसगाड्यांपैकी जवळपास ९० टक्के गाड्या रोज रस्त्यावर आल्या पाहिजेत. ‘ब्रेकडाउन’चे प्रमाण एक टक्‍क्‍यापेक्षा कमी असावे. त्यामुळे खर्चात कपात होऊन उत्पन्न वाढणार आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील कामाचा रोजच्या रोज आढावा घेण्यात येणार आहे.’’

त्या त्या डेपोकडील चालक आणि वाहक यांच्या कामाचे नियोजन, बसगाड्यांच्या फेऱ्या याबाबतही काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार कामे झाल्यास सेवा सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उत्पन्नही वाढेल. या प्रक्रियेत काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल,’’ असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

तक्रारींसाठी मोबाईल ॲप 
पीएमपीने सुरू केलेल्या pmpeconnect या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्याची सोय आहे. त्यात, बसगाड्या थांब्यावर उभ्या केल्या जात नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. अन्य स्वरूपाच्याही तक्रारी येत आहेत. त्यांची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तक्रारीनंतर २४ तासांत दखल घेण्यात येते. या तक्रारींच्या माध्यमातून आवश्‍यक ते बदल करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.