सर्वंकष आराखड्यातून मेट्रोचे मार्ग निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी "सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्‍चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर "पीएमआरडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्‍चित करण्यात येणार आहे. 

पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी "सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्‍चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर "पीएमआरडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्‍चित करण्यात येणार आहे. 

मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महापालिकेच्या पाठीमागून आलेल्या "पीएमआरडीए'ने बाजी मारत हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीचा इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यास राज्य सरकारने मान्यताही दिली. त्यापाठोपाठ या कामासाठी जागतिक (ग्लोबल) निविदा मागवून अहवाल तयार करण्याचे कामही पीएमआरडीएने सुरू केले असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण होत आली आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर पाठोपाठ पीएमआरडीएने शहरातील आखणी आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली होती. प्रायोगिक तत्त्वावर हे मार्गदेखील निवडले होते. त्याची पूर्वसुसाध्यता तपासणी करूनच हे मार्ग निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी यापूर्वीच दोन वेळा बैठकाही झाल्या. या मार्गांची पूर्वसुसाध्यता तपासणीचे काम दिल्ली मेट्रोला देण्याचे जवळपास निश्‍चित केले होते. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार होते. 

निश्‍चित मार्गांचे "डीपीआर' हवे 
नवे आठ मार्ग निवडताना पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडणारे हे मार्ग असावेत; तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक मार्ग ठेवावेत. जेणेकरून शहरात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारणे शक्‍य होईल, हा हेतू त्यामागे होता. मात्र, पीएमआरडीएने सुचविलेल्या आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्याऐवजी संपूर्ण हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा. त्यातून मेट्रो प्रकल्पाचे मार्ग निश्‍चित करावे. ते मार्ग निश्‍चित झाल्यानंतर त्या मार्गांचे डीपीआर तयार करण्यात यावा, असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. 

..तरच मेट्रोचे जाळे शक्‍य 
मार्ग निश्‍चित झाल्यानंतर त्याचे डीपीआर तयार करावे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबरोबरच मोनो रेल, बीआरटीसह अन्य वाहतुकीसाठी एकमेकांना पूरक प्रकल्प "पीएमआरडीए'ला हाती घेणे योग्य ठरेल. त्यातूनच मेट्रोचे जाळे निर्माण करणे शक्‍य होईल, असे दिल्ली मेट्रोने कळविले आहे. 

"पीएमआरडीए'च्या कार्यक्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून मेट्रो, रिंगरोड, बीआरटी यासह वाहतुकीचे विविध पर्याय एकमेकांना कसे जोडता येईल, हे निश्‍चित करण्यात येणार आहे. कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविणे फायदेशीर ठरेल, हे त्यातून निश्‍चित होईल. 
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए