कोकणात जाण्यासाठी उद्यापासून जादा गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - गौरी- गणपती सणासाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान जादा गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाकडून केले आहे. स्वारगेट, पिंपरी चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोकणवासीय नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. 25 ऑगस्टला गणेशोत्सवास सुरवात होत आहे. याचा विचार करून एसटीच्या पुणे विभागाने चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड, पोलादपूर या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या सध्याच्या गाड्यांच्या संख्येत जादा गाड्या वाढविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, या गाड्यांचे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, मान्यताप्राप्त खासगी एजंटांमार्फतही ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. दरम्यान, एकाच ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या चाळीस नागरिकांनी ग्रुप करून मागणी केल्यास त्यांना संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे.