पीएमपीच्या 1550 बस अन्‌ 2400 ब्रेकडाउन ! 

पीएमपीच्या 1550 बस अन्‌ 2400 ब्रेकडाउन ! 

पुणे - पीएमपीच्या ताफ्यातील 2000 बसपैकी सुमारे 1550 बस दररोज मार्गांवर धावतात. मात्र, दरमहा ब्रेकडाउनच्या किमान 2400 घटना घडत आहेत. जुन्या बसची वाढत असलेली संख्या आणि वाहतूक कोंडी, यामुळेही ब्रेकडाउनची संख्या वाढत आहे. 

पीएमपीच्या सुमारे 250 मार्गांवर सध्या 1550 बस दररोज धावत आहेत. मात्र, वाहतूक कोंडीचा पीएमपीला मोठा त्रास होत आहे. परिणामी, बसच्या ब्रेकडाउनची संख्या वाढत आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या, तरीही ब्रेकडाउनची डोकेदुखी कमी होत नाही. शहरात बसला वारंवार ब्रेक दाबावा लागला, तर इंजिनच्या विविध घटकांवर ताण येतो. तसेच, चाकांतील हवाही कमी होते. त्यामुळे बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेतल्यास, जुलैमध्ये 2850, ऑगस्टमध्ये 2499, सप्टेंबरमध्ये 2560 आणि ऑक्‍टोबरमध्ये 2579 ब्रेकडाउन झाले आहेत. अनेकदा रस्त्यावर बस उभी करून दुरुस्ती केली जाते. गंभीर बिघाड असेल, तर क्रेनद्वारे बस नजीकच्या डेपोत नेली जाते आणि तेथे दुरुस्ती होते. बस दुरुस्त करण्यासाठी पीएमपीने 12 मोबाईल व्हॅनही तयार केल्या आहेत, त्याद्वारेही दुरुस्ती होते. मात्र, कालमर्यादा संपलेल्या आणि 7 ते 10 वर्षे 

आयुर्मान असलेल्या बसची वाढती संख्या ब्रेकडाउनची संख्या वाढण्यास कारणीभूत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

ब्रेकडाउन रोखण्यासाठी विविध उपाय 
ब्रेकडाउन कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे म्हणाले, ""पीएमपीमध्ये आता रात्रीही बसच्या देखभाल- दुरुस्तीची कामे होत आहेत. पूर्वी 45 हजार किलोमीटर बस धावल्यावर संपूर्ण इंजिनची दुरुस्ती होत असे. आता 20 हजार किलोमीटरनंतर इंजिनची देखभाल- दुरुस्ती केली जाते. यापूर्वी 3500 किलोमीटर बस धावल्यावर सर्व्हिसिंग होत असे. आता 10 दिवसांनी किंवा 2000 किलोमीटर अंतर धावल्यावर बसची सर्व्हिसिंग होते. सुटे भाग वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे मिळतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.'' बसच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी निश्‍चित केली आहे. त्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते. पूर्वीच्या तुलनेत ब्रेकडाउनचे प्रमाण कमी झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. जुन्या बसची दुरुस्ती करून त्याही मार्गावर धावतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

अप्परच्या घटनेची चौकशी सुरू 
अप्पर इंदिरानगरमधील अपघाताची घटना समजताच पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तेथे धाव घेतली. संबंधित बस अप्पर इंदिरानगरवरून स्वारगेटच्या दिशेने चालली होती. खासगी कंत्राटदाराची भाडेतत्त्वावरील ही बस आहे. अपघाताला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत होता, असे प्राथमिक चौकशीत आढळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बसचा हॅंडब्रेक आणि नियमित वापरला जाणारा ब्रेक सुस्थितीत असल्याचे पीएमपीच्या तांत्रिक तपासणीत आढळले. टायरमध्ये पुरेशी हवाही होती. त्यामुळे बसमधील एखादा तांत्रिक दोष अपघाताला कारणीभूत नाही, असेही त्यांनी सांगितले. संबंधित चालकाला नोकरीवरून कमी करण्याच्या सूचना पीएमपीने ठेकेदाराला दिल्या आहेत, तर गंभीर जखमी असलेल्या योगेश कुडले (वय 35) याला तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश पीएमपीने दिला आहे, अशी माहिती अपघात विभागप्रमुख संजय कुसाळकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com