पुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.

रेल्वे मंडळाच्या अभियांत्रिकी मंडळाचे सदस्य, मध्य रेल्वेचे अधिकारी यांचा एक अभ्यास गट सोमवारी पुण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली. मेट्रो प्रकल्पात शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनला सामावून घेण्याची चर्चा त्या वेळी झाली. त्याला दीक्षित तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही अनुकूलता दर्शविली. शिवाजीनगर एसटी आणि रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून जाता येईल, तर पुणे स्टेशनवरून प्रवाशांना रस्त्यावरील (एलिव्हेटेड) मार्गातून जाता येईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. हडपसर, खडकी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांनाही मेट्रो मार्गाशी सुसंगत करण्यात येणार आहे, त्यामुळे लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही मेट्रोतून प्रवास करू शकतील. त्यासाठी रेल्वे स्थानकातूनच मेट्रो स्थानकात जाता येईल, अशी रचना करण्यावर एकमत झाले आहे. यापुढील काळात शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा आराखडा मेट्रोशी सुसंगत करण्यात येईल. त्यानुसार त्या स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

कोथरूडमध्ये महिनाभरात खांब
वनाज - रामवाडी मेट्रो मार्गावरील एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील पहिला खांब येत्या महिनाभरात उभारला जाणार आहे. पहिला खांब उभारल्यावर पुढील खांबही वेगाने उभारले जातील. दरम्यान, शिवाजीनगर स्थानक ते कसबा पेठ दरम्यान आणि जंगली महाराज दरम्यानच्या पादचारी पुलाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पुलाचा आराखडा तयार झाल्यावर त्याला मंजुरी घेऊन निविदा मागविल्या जातील, असेही दीक्षित यांनी सांगितले.

भुयारी मेट्रोचे काम फेब्रुवारीपासून
पिंपरी- स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू झाले आहे. त्यातील शिवाजीनगर- स्वारगेट हा टप्पा भुयारी असेल. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. पुढील अडीच वर्षे ते सुरू राहणार आहे. या काळात तेथील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी महामेट्रो आणि वाहतूक पोलिस संयुक्तपणे आराखडा तयार करीत आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.