‘मिडी बस’च्या माध्यमातून शटल सेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पीएमपीच्या ताफ्यात ८०० बस दाखल करण्यासाठी त्यांची खरेदी करायची आहे. या बस डिझेलच्या घ्यायच्या की सीएनजीवर धावणाऱ्या, याचा निर्णय तज्ज्ञांची समिती घेणार आहे. त्याचा अहवाल पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते सादर करतील. लवकरच ही बैठक होणार असून, त्यात जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

पुणे - शहरात येत्या तीन महिन्यांत सुमारे १५-२० मार्गांवर ‘शटल बस’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यांपासून दाखल होणाऱ्या ‘मिडी’ म्हणजेच ३५ सीटर बसच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याबरोबर मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याची प्रक्रियादेखील पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे ३५० हून अधिक असलेले मार्ग आता २४३ वर आले आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यांत २०० मिडी बस दाखल होणार आहेत. अनुक्रमे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने १२० आणि ८० बससाठी निधी दिला आहे. त्यांची २५ टक्के रक्कम देण्यात आली असून, दोन्ही महापालिकांनी उर्वरित निधी दिल्यावर त्या बस पीएमपीत दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होईल. या बस प्रामुख्याने ज्या रस्त्यांवर वाहनांची संख्या जास्त आहे, त्याच रस्त्यावर वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून ‘लिमिटेड बस’ किंवा शटल बसचा प्रयोग करण्यात येणार आहे. 

प्राथमिक टप्प्यात २० मार्ग निश्‍चित
स्वारगेट ते शिवाजीनगर किंवा स्वारगेट ते पुणे स्टेशन, अशा स्वरूपाची ही बससेवा सुरू असेल. मधल्या थांब्यांवर ही बस थांबणार नाही. त्यामुळे थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच मधल्या थांब्यांवरील प्रवाशांनाही नेहमीच्या बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळू शकेल. लिमिटेड बससाठी प्राथमिक टप्प्यात सुमारे १५-२० मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. मिडी बस ताफ्यात दाखल झाल्यावर या मार्गांवरील वाहतूक सुरू होईल, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

वेळेत बस मिळतील याकडे लक्ष
शहरात कोठेही बससेवा खंडित न करता मार्गांची फेररचना करून प्रवाशांना वेळेत बस मिळतील, याकडे लक्ष देण्यात येत असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या तक्रारी आल्यास त्यांची शहानिशा करून आवश्‍यक ते बदलही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्गांची संख्या ३७० वरून २४३ वर
अनेक मार्गांवर प्रवासी संख्या कमी असूनही तेथे बससेवा सुरू आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गावर बससंख्या कमी पडत असल्याचे दिसते. गेल्या दोन महिन्यांपासून प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बससेवेचे नियोजन केले जात आहे. प्रवाशांचा चढ-उतार लक्षात घेऊन मार्गांची फेररचना करण्यात येत आहे. त्यामुळे एकेकाळी असलेले ३७० मार्ग आता २४३ वर आले आहेत. एक महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आयुर्मान संपलेल्या बस बाद
आयुर्मान संपल्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे २५० बस ३१ मार्चपर्यंत काढून टाकाव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणात बससंख्या वाढेल, त्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने आयुर्मान संपलेल्या बस काढल्या जातील, असे मुंढे यांनी नमूद केले.

२०० -  मिडी बस दाखल होणार

२४३ - फेररचनेनंतर मार्ग निश्‍चित

पुणे

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीला सव्वावर्षांपेक्षा जास्त कालावधी असताना केवळ आपली धास्ती घेतल्यामुळे लक्ष्मण जगताप उसने...

02.42 AM