महिला प्रवाशांसाठी दोन महिन्यांत ‘स्पेशल बस’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी महिलांसाठी ‘स्पेशल बस’ सेवा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ३०-४० बसची खरेदी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी महिलांसाठी ‘स्पेशल बस’ सेवा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ३०-४० बसची खरेदी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारने काही शहरांत महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पीएमपीच्या वाट्याला सुमारे दहा कोटी रुपये आले आहेत. त्यातून या बसची खरेदी करण्यात येणार आहे. या बस प्रत्येकी ३२ प्रवासी आसन क्षमतेच्या असतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ४५ हून अधिक मार्गांवर केवळ प्रवासी महिलांसाठी त्या धावतील, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली. पर्यावरणाविषयक केंद्र सरकारने दिलेल्या निकषांचे पालन करून या बसची खरेदी केली जाईल. या बस डिझेलवर धावणार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बस खरेदीची प्रक्रिया पीएमपीकडून पूर्ण होणार आहे. त्यासाठी निविदा तयार करण्यात आल्या आहेत. निविदांमधील तांत्रिक तपशीलांबाबत माहिती ७ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडून दिली जाणार आहे. बस खरेदीसाठी निविदा सादर करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा सादर होणार आहेत, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. निविदेमध्ये बसचे जे दर येतील त्यानुसार बसची संख्या ३०, ३५ किंवा ४० असू शकेल. निविदा प्रक्रिया वेळेत पार पडली तर दोन महिन्यांत संचालक मंडळाची मंजुरी घेऊन कार्यादेश (वर्कऑर्डर) दिला जाईल. त्यानंतर एक- दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रशासकीय नियोजन अंतिम टप्प्यात 
महिलांसाठी तेजस्विनी योजनेअंतर्गत बस खरेदी 
होणार आहे. या बस प्रवासी महिलांसाठीच असतील. 
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या मार्गांवर प्रवासी 
महिलांची संख्या जास्त असते (उदाः निगडी- कात्रज, 
कात्रज- शिवाजीनगर, स्वारगेट- पुणे स्टेशन) अशा मार्गांवर पहिल्या टप्प्यात या बस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीचे प्रशासकीय नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news special bus for women