स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह मदत करणार 

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज आणि इस्रायलच्या तेल अविव युनिव्हर्सिटीच्या "कॅप्स्युला स्टुडिओ'शी करार झाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) "भाऊ इन्स्टिट्यूट' या स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटरमध्ये या विशिष्ट क्षेत्रातील स्टार्टअप्सला जागेसह सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज आणि इस्रायलच्या तेल अविव युनिव्हर्सिटीच्या "कॅप्स्युला स्टुडिओ'शी करार झाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) "भाऊ इन्स्टिट्यूट' या स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटरमध्ये या विशिष्ट क्षेत्रातील स्टार्टअप्सला जागेसह सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

"पिनॅकल-कॅप्स्युला इंडिया' नावाने हा उपक्रम 2018 पासून राबविला जाणार आहे. "स्मार्ट ट्रान्स्पोर्टेशन' या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ दहा लाख कोटी डॉलर एवढी मोठी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्यात करणारा देश म्हणून इस्रायल जगभरात ओळखला जातो, तर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा आणि संधी यानुसार स्टार्टअप्सच्या उत्पादनामध्ये योग्य बदल करून देण्याचे काम कॅप्स्युला स्टुडिओतर्फे केले जाते. त्यासाठी यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून स्टार्टअप्सचे संस्थापक, नवउद्योजकांना मार्गदर्शन केले जाते. थोडक्‍यात भारतीय स्टार्टअप्सला जागतिक पातळीवरील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. 

पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मेहता म्हणाले, ""भारतीय स्टार्टअप्सच्या यशामध्ये इन्क्‍युबेटर व ऍक्‍सलरेटर यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. पिनॅकल कॅप्स्युला अशाचप्रकारे स्टार्टअप्सला योग्य व्यवसाय पद्धती, संधी आणि मार्गदर्शन करणार आहे. सुरवातीच्या टप्प्यातील गुंतवणूक पिनॅकल करणार असून, संभाव्य गुंतवणूकदार आणि त्या-त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांबरोबर शाश्‍वत भागीदारी प्रस्थापित करण्यासाठीही पिनॅकल प्रयत्नशील राहणार आहे. सध्या स्मार्ट मोबिलिटी क्षेत्रातील व त्यानंतर कृषी, अन्न, आरोग्य, औषध, शिक्षण आणि अन्य क्षेत्रातील स्टार्टअप्सला या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.'' 

सीओईपीच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तळेले म्हणाले, ""भाऊ-कॅप्स्युला इंडिया नावाने हा प्रोग्रॅम पुण्यात सुरू होणार आहे. तीन ते पाच वर्षांसाठीचा हा परस्पर सामंजस्य करार (एमओयू) आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज, मोबिलिटी क्षेत्रातील स्टार्टअप्सला यामध्ये सहभागी होता येईल. या स्टार्टअप्सला सर्व सोयी-सुविधा पुरविण्याचे काम भाऊ इन्स्टिट्यूट करणार आहे.'' 

स्मार्ट मोबिलिटी म्हणजे काय? 
प्रवासी आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षात जेवढे बदल झाले नसतील तेवढे बदल येत्या दशकात होऊ घातले आहेत. स्वयंचलित मोटारी, इलेक्‍ट्रिक ड्राइव्ह ट्रेन, रोबोटिक जहाज, ड्रोन्स यामुळे जमीन, पाणी आणि हवाई वाहतुकीचे चित्र पालटणार आहे. त्याचा परिणाम कृषी आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन क्षेत्रावरसुद्धा होणार आहे. 

"कॅप्स्युला स्टुडिओ' काय करणार? 
उत्पादन आणि बाजारपेठेतील मागणीची सांगड घालण्यास स्टार्टअप्सला मदत करण्यासाठी "कस्टमर व्हॅलिडेशन प्रोग्रॅम' राबविण्यात येतो. उत्पादन बाजारात आणण्यापूर्वीच त्याची मागणी वाढविणे आणि कमी पैशात अधिकाधिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी स्टार्टअप्सला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी "कॅप्स्युला स्टुडिओ'ची स्थापना करण्यात आली आहे. नवउद्योजक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी "नॉलेज सेंटर' म्हणून "कॅप्स्युला स्टुडिओ' काम करते. स्मार्ट मोबिलिटी क्षेत्रातील स्टार्टअप्सला जागतिक पातळीवरील बाजारपेठेचे "कस्टमर व्हॅलिडेशन' करून देण्यासाठी "कॅप्स्युला स्टुडिओ'मध्ये दरवर्षी दोन वेळा कार्यक्रम घेतले जातात. दीड महिन्याच्या कालावधीत स्टार्टअप्सची निवड करणे, त्यापुढच्या दीड महिन्यात "इंडक्‍शन ट्रेनिंग' म्हणजे कंपनीशी ओळख आणि त्यानंतरचे तीन महिने प्रत्यक्षातील "कस्टमर व्हॅलिडेशन प्रोग्रॅम' राबविला जातो. 

Web Title: pune news technology startup