वृक्षगणनेस अखेर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहरातील सर्व वृक्षांची गणना भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून केली जाणार आहे. त्याशिवाय वृक्षगणनेसाठी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली जाणार आहे. या प्रणालीच्या वापरामुळे लावलेल्या आणि तोडलेल्या झाडांची नेमकी संख्या समजणार आहे. तसेच झाडांच्या अवैध कत्तलीलाही लगाम बसणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 27) महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली.

वृक्षगणनेसाठी महापालिकेतर्फे सहा लाख 46 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. यापूर्वी 2003-2004 या वर्षात वृक्षगणना केली होती. तेव्हा शहरात 17 लाख झाडे होती. संबंधित वृक्षगणनेसाठी 41 लाख रुपये खर्च झाला होता. आजमितीला सुमारे 22 लाख झाडे शहरात आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने सभेत दिली. 14 वर्षांमध्ये प्रशासनाने किती झाडे लावली? दरवर्षी लावली जाणारी झाडे पाहता झाडांची संख्या वाढायला हवी होती; मात्र ही संख्या अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही.

वृक्षगणना झालेली नाही, असे विविध मुद्दे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्या आशा शेंडगे यांनी उपस्थित केले. महापालिकेतर्फे कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांत वृक्षगणनेचे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार संस्थेकडे असणार आहे.

फेस्टिव्हलच्या नियोजनाबद्दल अधिकाऱ्यांचा सन्मान
महापालिकेने घेतलेल्या पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचे कमी वेळेत चांगल्या प्रकारचे नियोजन केल्याबद्दल सहशहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, संजय कांबळे, सतीश इंगळे यांचा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वृक्षगणनेमुळे फायदे
* शहरातील सर्व झाडांची माहिती "जीआयएस' प्रणालीद्वारे होणार संकलित
* सर्वसामान्य नागरिकांना महापालिका संकेतस्थळावर ही माहिती पाहता येणार
* लावलेली झाडे आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या झाडांची नेमकी संख्या समजणार
* किती अंतरावर झाडे आहेत, फक्त बुंधा शिल्लक आहे का?
कीड लागलेली झाडे किती, याची माहिती कळणार
* "ग्लोबल वॉर्मिंग'च्या पार्श्‍वभूमीवर वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे
प्रमाण कमी करणारी झाडे किती, याची संख्या समजणार