‘तोंडी तलाक’च्या निर्णयामुळे महिलांची वाटचाल सुकर’

‘तोंडी तलाक’च्या निर्णयामुळे महिलांची वाटचाल सुकर’

पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे सर्व समावेशकता आणि सक्षमीकरण या दिशेने मुस्लिम महिलांच्या वाटचालीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी समाधानकारक भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

रझिया पटेल (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) : ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुस्लिम महिलांच्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने यश आल्याचे म्हणता येईल. मुस्लिम समाजातील महिलांच्या न्यायासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ‘तोंडी तलाक हा घटनाबाह्य’ असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे घटनेनुसार महिलांना न्याय मिळाला आहे. याबाबत जागृतीसाठी मोहीम हाती घेण्याची आणि मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तळागळातील महिलांपर्यंत न्यायालयाचा हा निर्णय पोचला आणि तिला न्याय मिळाला, तरच या लढ्याचे फलित झाले, असे म्हणता येईल. तोंडी तलाक आणि त्याच्याशी संबंधित अत्याचार रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला पाहिजे. मुस्लिम समाजातील सर्व महिलांनी या निर्णयाचे स्वागत करणे आवश्‍यक आहेच, तसेच निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले पाहिजेत.’’

डॉ. बेनझीर तांबोळी (प्रमुख, महिला मंच, मुस्लिम सत्यशोधक मंडळ) : ‘‘मानवतावादी दृष्टिकोनातून आणि संविधानिक पद्धतीने मुस्लिम महिलांना या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे. परंतु या आदेशानुसार सरकारने सहा महिन्यांत कायदा तयार करून तो सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयानंतर कायदा बनविण्यात येईपर्यंत, त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. तसेच, सर्वच भारतीयांनी मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे राहायला हवे.’’

अंजूम जावेद पठाण (शिक्षिका) - ‘‘गरज संपली की तुच्छतेने पुरुष तलाक, तलाक, तलाक म्हणत महिलेला सोडून देतात; पण पुढे त्या महिलेचे काय होत असेल, याचा कोणी विचारही करत नव्हते. इतके सोपे असते का आयुष्य...? याचा विचार करत न्यायालयाने घेतलेला निर्णय सर्वच महिलांना आनंद देणारा आहे. स्त्री आणि पुरुषांना एका पातळीवर आणणारा आहे. ‘यांच्या धर्मात असे असते’, ही टीका आणि पुरुषांची मनमानी आता थांबेल.’

तोंडी  तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असून त्यामुळे मुस्लिम महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेस बळ देणारा आजचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकार लवकरच यासंदर्भात सर्वसमावेशक कायदा करेल.
- अनिल शिरोळे, खासदार 

तोंडी तलाकबाबतचा निकाल मुस्लिम महिलांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे. सहा महिन्यांत कायदा झाल्यावर मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षितता मिळेल आणि कौटुंबिक अत्याचारास आळा बसेल. तसेच, त्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील. हा निकाल व्यापक स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
- मेधा कुलकर्णी, आमदार 

धर्माच्या रुढी-परंपरेखाली महिलांची मानसिक व शारीरिक फरफट होत होती. मात्र, ‘तोंडी तलाक’बाबत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. त्यामुळे पीडित महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. याच विषयाला अनुसरून असलेल्या ‘हलाल’ या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारली असून, त्यात महिलांच्या वेदना मांडल्या आहेत. 
- प्रीतम कांगणे, अभिनेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com