चालता चालता निराधारांना अर्थसाहाय्य "इम्पॅक्‍ट रन' "मोबाईल ऍप'मुळे व्हा दानशूर

वैशाली भुते
शुक्रवार, 7 जुलै 2017

पिंपरी (पुणे): ईशान दररोज तीन किलोमीटर चालतो.. अर्थात त्यातून तो निरोगी आरोग्य तर कमावतोच आहे; पण त्याबरोबर दिवसाला तीस रुपयांचा निधी संकलित करतोय. तर, अतुल पाठक हे ज्येष्ठ नागरिकही नियमितपणे पाच किलोमीटर चालून त्यामध्ये पन्नास रुपयांची भर घालत आहेत. स्वतःचे आरोग्य राखतानाच ते सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोलाचे कार्यही करत आहेत. अर्थात, ईशान आणि पाठक हे याचे प्रातिनिधिक उदाहरण. परंतु, आपल्यापैकी प्रत्येकाला या कार्यात सहभागी होण्याची आयती संधी "चालून' आली आहे.

ती कशी काय? आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण, आपल्यातीलच काही युवकांनी नागरिकांना चालण्याची प्रेरणा देण्यासाठी "इम्पॅक्‍ट रन' (IMPACT RUN) हे "मोबाईल ऍप' विकसित केले आहे. केवळ चालण्याचीच नाही, तर चालता चालता समाजाला आर्थिक हातभार लावण्याची संधीही देऊ केली आहे. तुमच्या काही किलोमीटर चालण्यातून एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होणार आहे. तर, एखाद्या गरीब रुग्णाला चांगले उपचार मिळून तो रोगमुक्त होणार आहे. एवढेच नाही, तर एखाद्या निराधाराला तुमच्यामुळे जगण्यासाठी आधार मिळणार आहे.
अनेकांना हे सर्व काल्पनिक आणि अतिशयोक्तीचेही वाटत असेल. मात्र, परदेशातील पाच-सहा आकडी पगाराच्या नोकऱ्या सोडून समाजसेवेचा वसा घेतलेल्या ईशान नाडकर्णी, निखिल खंडेलवाल, पीयूष नागले, अंकिता महेश्‍वरी, गौरव मेहरा आणि आकाश नौटियाल यांनी एकत्र येऊन ते सिद्धही करून दाखविले आहे. वापरण्यास सहज, सोपे आणि मजेशीर असलेले हे "ऍप' सर्वार्थाने "अर्थ'पूर्ण आहे. ते कोणालाही "गुगल प्ले स्टोअर' अथवा "ऍपल ऍप स्टोअर'वरून डाउनलोड करता येते.

असा आहे ऍपचा "अर्थ'
मोबाईलवर डाउनलोड केलेले हे "ऍप' चालताना सुरू ठेवल्यास प्रत्येक किलोमीटरमागे चालणाऱ्याच्या नावे दहा रुपये जमा केले जातात. हे जमा पैसे काही निवडक संस्थांना निधी म्हणून दिले जातात. विशेषतः तुम्हाला हे पैसे कोणत्या संस्थेला दान करायचे आहेत, हे निवडण्याचे स्वातंत्र्यही तुम्हाला दिले आहे. तर, प्रत्यक्ष तुमच्या खिशाला कोणतीही झळ पोचू नये याची काळजीही घेतलेली आहे. "डेव्हलपमेंट बॅंक ऑफ सिंगापूर', "आरती इंडस्ट्रीज', "केर्न इंडिया', "हीरोतोटोकोर्प', "वेलस्पन' या कंपन्यांनी "सीएसआर' (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) फंडातून ही जबाबदारी उचलली आहे.

फायदे..
अशाच प्रकारे झालेल्या निधी संकलनातून उत्तर काशीतील एका दुर्गम भागात नुकतीच एक शाळा सुरू झाली. तर, जवानांच्या विधवांच्या सबलीकरणाचे कामही या निधीतून केले आहे. यापुढेदेखील अशाच प्रकारे गरजूंच्या मूलभूत गरजा भागविण्याचे या तरुणांचे उद्दिष्ट आहे. चला तर मग, "IMPACT RUN' वापरा.. चाला.. स्वतःचे आरोग्य सुधारा आणि गरजूंना मदत करण्याचे पुण्यही विनासायास पदरात पाडून घ्या, असे आवाहन या तरुणांनी केले.