‘स्वीकृत’ नावात कदापि बदल नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पिंपरी -  महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाने यापूर्वी दिलेलीच नावे कायम राहतील, त्यात कुठलाही बदल कदापि होणार नाही, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (ता. १६) ‘सकाळ’ला दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्ष कार्यालयातील फलकावर काळे फासणारे आणि पुतळे जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत, असेही साबळे यांनी सांगितले.

महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्याच समर्थकांची वर्णी लावण्यासाठी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुने जाणते कार्यकर्ते म्हणून ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माउली थोरात यांची, तसेच दाक्षिणात्य चेहरा म्हणून बाबू नायर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या तिघांनी अर्ज दाखल केल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील फलकावरील साबळे आणि राज्य लेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या छायाचित्रांना काळे फासले आणि पुतळे जाळले. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार साबळे, प्रदेश सदस्या उमा खापरे, माउली थोरात व बाबू नायर उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती खासदार साबळे यांनी ‘सकाळ’ला दिली. ते म्हणाले, ‘‘पक्ष कार्यालयात झालेल्या सर्व प्रकरणाची विस्तृत माहिती मी या वेळी दिली. पक्षाच्या उमेदारांचे अर्ज बाद करण्यासाठी कोण कसा प्रयत्न करतो आहे? याचाही तपशील सांगितला. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकृतसाठी दिलेल्या नावांमध्ये कदापि बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले. १९ मे रोजी महापालिका सभेत निवड प्रक्रियेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आम्हाला सांगितले आहे.’’

पुतळे जाळणाऱ्यांवर कारवाई?
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळे जाळपोळीची गंभीर नोंद घेतलेली आहे. या प्रकरणात पुतळे बनविणारे, त्यांना चिथावणी देणारे, भाषण करणारे, याचीही माहिती त्यांनी मागविली आहे. सर्व माहिती येताच कठोर कारवाई करणार असल्याचे दानवे यांनी आम्हाला सांगितल्याचे खासदार अमर साबळे यांनी नमूद केले.

Web Title: There is no change in the 'accepted' name