पुणे - सांगवीत लोखंडी जाळ्यांच्या कैदेत झाडे गुदमरली

रमेश मोरे
सोमवार, 28 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : महापालिका रस्ते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन विभागाकडून काही वर्षांपूर्वी सांगवी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली आहेत. लहान रोपे लावुन ती सरळ वाढावीत, भटक्या जनावरांपासुन रोपांचे संरक्षण व्हावे, वादळ वाऱ्यापासुन रोपे मोडुन पडु नयेत या उद्देशाने झाडांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्या बसविण्यात येतात.

सांगवीतील अनेक झाडांना वृक्ष लागवड करताना या लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. मात्र सध्या मोठ्या झालेल्या या झाडांना याच लोखंडी जाळ्या कैद ठरू लागल्या आहेत. सांगवी अंतर्गत  रस्त्याकडेला येथील मुळा नदी किनारा रस्ता, आनंदनगर रस्ता, संगमनगर, ममता नगर रस्ता, दत्तमठ आदी भागातील गेल्या काही वर्षांपूर्वी झाडांच्या बाल्यावस्थेत लावलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या झाडांच्या मुळावर उठल्या आहेत. यात अनेक झाडे गुदमरली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडांनी या लोखंडी जाळ्या स्वत:च्या अंगात सामावून घेतल्या आहेत. यामुळे झाडे या लोखंडी जाळ्यांच्या मानव निर्मित कैदेत अडकल्याचे चित्र सांगवी परिसरातुन पहावयास मिळते.

या गोष्टींकडे मात्र महापालिका सबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. सांगवी अंतर्गत जवळपास पन्नास मोठ्या झालेल्या झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याची गरज आहे. अनेक झाडे मोठी झाल्याने जाळ्या झाडात रूतुन बसल्या आहेत. याबाबत वृक्ष संवर्धन विभागाकडुन दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येत असल्या बाबत वृक्षप्रेमी मंडळींकडुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित देखभाल करणाऱ्या विभागांकडून या जाळ्या काढण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

परिसरातील अनेक झाडे लोखंडी जाळीत अडकली आहेत. झाडांवर जाहीराती लावणे, खिळे ठोकणे अशा प्रकारांना प्रतिबंध केला पाहिजे.
- राजु सावळे, सामाजिक कार्यकर्ते

संबंधित विभागास याची कल्पना दिली आहे. प्रभागातील सर्वच झाडांची पाहणी करून झाडांना अडचण ठरणाऱ्या लोखंडी जाळ्या काढण्याबाबत सुचना केली आहे.
- संतोष कांबळे, नगरसेवक

Web Title: trees stuck in compound in sangavi pune