२६ जुलै १९९९ : कारगिल विजय दिन आणि आज...

स्नेहलता सत्यवान जगताप
बुधवार, 26 जुलै 2017

पाकिस्तानी सैनिकांच्या सापडलेल्या वस्तू, बंदुकी, दारुगोळा, ध्वज, पत्ते असलेले पुरावे व प्रत्यक्ष काही जिवंत व कामी आलेले सैनिक यांचे फोटो असलेले दालन पाहिले अन् या पाकड्यांना अजून काय पुरावा द्यायचा असा मनात प्रश्न पडला. त्यांच्या हुतात्मा झालेल्या जवानांना ध्वजात सन्मानाने लपेटलेले पाहिले अन् आपल्या जवानांची त्यांनी केलेली अवहेलना आठवली. शेवटी संस्कार... 

भारत-पाक युद्ध लडाख जिल्ह्यातील कारगिल या ठिकाणी झाले. जून, जुलैमध्ये जोरदार हल्ले-प्रतिहल्ले चालू होते. प्राणाची बाजी लावून भारतीय नवजवानांनी विजयश्री खेचून आणली. ऑपरेशन विजय यशस्वी झाले. तो शुभ दिन सारा भारत 'कारगिल दिन' म्हणून साजरा करतो. प्रत्यक्ष जाऊन ती पुण्यभूमी, जवानांची कर्मभूमी नव्हे, तर ते तीर्थक्षेत्र पाहण्याची आस लागली होती. लेह-लडाखची सहल ठरली अन् कारगिलला जाणार याचाच आनंद जास्त झाला. 

पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे 12 जुलै 2017 प्रवास सुरू झाला. लेहमधील सर्व प्रेक्षणीय स्थळं पाहून 18 जुलै रोजी करगिलच्या दिशेने निघालो. मनाचा वेग गाडीच्या पुढे होता. संध्याकाळी कारगिल गावात पोचलो. कल्पनेपेक्षा गाव मोठे आहे. गावातून खळाळत वाहणारी नदी अन् कडेने उंच पर्वत. LoC पाहून आम्ही भारावून गेलो होतो. प्रवासाचा शीण आला नव्हता, पण सहज म्हणून टीव्ही लावला तर पुण्यातील सरहद संस्थेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचा व बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे धावते समालोचन चालू होते. 16 जुलैला तो कार्यक्रम झाला होता. मान्यवरांची भाषणे चालू असताना एक जाणवले की, कारगिलमध्ये प्रत्येक नागरिकाला जवानांबद्दल आपुलकी व आदर आहे. त्यांना सहकार्य करणे ते कर्तव्य समजतात. 
नंतर कारगिलच्या बाजारपेठेत जाऊन आल्यानंतर सुद्धा तेच जाणवले. एका दुकानात खरेदी करत असताना त्यांना युद्धाच्या आठवणी विचारल्या. त्यांनी खूप भावनिक वर्णन केले. तोफेचे गोळे कसे गावात पडायचे, त्याचा आवाज आला की जमिनीवर पालथे पडून राहावे लागायचे, आणि बरेच काही. शेवटी आर्मीने सगळ्या लोकांना कसे स्थलांतरित केले, चार महिने खाणे-रहाणे कशी सोय केली व युद्ध संपल्यावर माघारी आणले. 

ते भाई शेवटी जे बोलले ते प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले तर आज श्रीनगरसारख्या ठिकाणी जवानांना ज्या समस्येला तोंड द्यावे लागते ते लाजिरवाणे प्रसंग घडणार नाहीत. ते म्हणाले, "भारतातल्या काना-कोपऱ्यातून हे नवजवान आपली व आपल्या देशाची काळजी घेण्यासाठी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता येतात. आपल्या भल्यासाठी आहोरात्र झगडतात. त्यांना सहकार्य नको का करायला? ते आपलेच आहेत. लोकांचे पैसे घेऊन आपल्या जवानांना दगड का मारायचे? हे चूक आहे. देव त्यांना माफ करणार नाही."
दगडफेक करणाऱ्यांना सुबुद्धी येवो, अशी आशा सदिच्छा व्यक्त करून व योग आला तर पुन्हा भेटू, असे म्हणून आम्ही तेथून निघालो. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 जुलैला आम्ही द्रासच्या दिशेने निघालो. पत्थर साहिब गुरुद्वारामधील पवित्र वातावरण अनुभवले. पुढे कारगिल जवानांच्या स्मारकाकडे रवाना झालो. जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला उंच बर्फाच्छादित शिखरांच्या कुशीत रुबाबात फडकणारा उंच तिरंगा पहिला अन् ऊर अभिमानाने भरून आला. भारावलेल्या मनानेच प्रवेश केला. गेटच्या वर व दोन्ही बाजूला लिहिलेली वाक्ये काळजावर कोरली गेली. आत शहिदांच्या स्मारकाकडे जाताना दुतर्फा तिरंगे. डाव्या बाजूला विमानाची प्रतिकृती तर उजव्या, बोफोर्सची. पावले नकळत रुबाबात पडत होती. थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला शहीद कॅप्टन मनोज पांडये गॅलरी आहे. बाहेर त्यांची शौर्यगाथा वाचताना अंगावर रोमांच उभे राहिले. आत प्रवेश करतानाच मनोमन सर्व शूर वीरांना सलाम केला. युद्धात बलिदान दिलेल्या वीरांची नावे, त्यांच्या रेजिमेंटसह होती. 'आम्हाला यांचा अभिमान आहे' हे वाचताना डोळ्यातील पाण्याने अक्षरे पुसट दिसत होती. पराक्रमाची गाथा वाचत, फोटो पहात पुढे सरकत होतो, पाय उचलत नव्हते, त्यांचा पराक्रम खिळवून ठेवत होता. एकीकडे अभिमानाने उर भरून येत होता, त्यांच्या आई-वडिलांचे, पत्नीचे, मुलांच्या त्यागाचे कौतुक वाटत होते व डोळे पण भरून येत होते. पण दुसरीकडे त्यांच्या पराक्रमाचे वर्णन वाचण्याइतका वेळही आपल्याकडे नाही म्हणून स्वतःला दूषण देत होतो. नंतर ते वाचता यावे यासाठी मोबाईलमध्ये त्या मजकुराचे फोटो काढून आम्ही ती कसर भरून काढली. 

पाकिस्तानी सैनिकांच्या सापडलेल्या वस्तू, बंदुकी, दारुगोळा, ध्वज, पत्ते असलेले पुरावे व प्रत्यक्ष काही जिवंत व कामी आलेले सैनिक यांचे फोटो असलेले दालन पाहिले अन् या पाकड्यांना अजून काय पुरावा द्यायचा असा मनात प्रश्न पडला. त्यांच्या हुतात्मा झालेल्या जवानांना ध्वजात सन्मानाने लपेटलेले पाहिले अन् आपल्या जवानांची त्यांनी केलेली अवहेलना आठवली. शेवटी संस्कार... 

बाहेर पडताना प्रत्येकजण निःशब्द झालो होतो. पूर्वी कारगिलला व सध्या अंदमानला कर्नल पदावर असलेले जैन सर त्यांच्या मुलगा व मुलीसह भेटले. त्यांच्याशी थोडे बोलून माघारी निघालो. कुमाऊँ रेजिमेंटच्या सैनिकांशी बोललो. पुढील पत्र व्यवहारासाठी व राखी पाठवण्यासाठी त्यांचे पत्ते घेतले. तेथील स्टोअरमध्ये पुस्तके, की-चैन, हॅट यांसारखी खरेदी करून बाहेर पडलो. कमानीच्या आतल्या बाजूला बाहेर पडणाऱ्यांसाठी विचार करायला लावणारा संदेश होता- When you go to home, tell them - We spend our today for your tomorrow. 
जड अंतःकरणाने पण बरेच काही घेऊन तेथून पुढे निघालो. 

पॅनद्रास, द्रूपकुंड वगैरे पाहिले. तिथल्या ट्रेकर्स बरोबर गप्पा मारल्या. पांडवांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या गिरीशिखरांचे, द्रौपदीच्या स्नान कुंडाचे फोटो काढले व करगिलच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. 21 जुलैला पुण्याला पोचलो पण अजूनही द्रास मधील विजय स्मारक डोळ्यांपुढून,मनातून जात नाही. या स्मृती कायमस्वरूपी अशाच प्रेरणा देत राहतील, वीर जवनांच्या बलिदानाची, धैर्याची, शौर्याची अन् त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण सर्व भारतवासी एकोप्याने राहिलो, धर्म-जात याच्या पलीकडे जाऊन मानवता हाच धर्म म्हणून जगलो तर आणि तरच आजपर्यंत बलिदान दिलेल्या सर्व शूर वीरांचे हौतात्म्य कामी येईल व आचंद्र सूर्य भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहील. 
कारगिल विजय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!