निसटलेला सूर पुन्हा जुळेल...

मोकळे व्हा जस्ट फॉर यू
मोकळे व्हा जस्ट फॉर यू

प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतःस हितकारक तसेच त्रासदायक पैलू असतात. सहसा हितकारक किंवा सुखावह पैलूंचा स्वीकार हा सहजरीत्या केला जातो; परंतु त्रासदायक पैलूंचे दायित्व आणि जनकत्वदेखील आपण इतर व्यक्ती, परिस्थिती, प्रसंग यावर अगदी सहजरीत्या सोडून देतो. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वातील शक्तिस्थानांचा व कमतरतांचा डोळसपणे विचार व स्वीकार केला जात नाही. बऱ्याचवेळा आपणास हितकारक व सुखावह वाटणाऱ्या गोष्टी अधिक उचलून धरल्या जातात, प्रोजेक्‍ट केल्या जातात आणि लंगडी बाजू (कमतरता) झाकून नेण्याचा प्रयत्न केला जातो.

माझ्या दोन्ही पावलांची (शक्तिस्थाने व कमतरता) जर एकमेकांशी मैत्री नसेल, तर मी उभे कसे राहणार? माझी स्वतःशी मैत्री नसेल, तर चिडण्यासाठी, रडण्यासाठी बाह्य व्यक्ती, घटनांची जरूरी नसते. स्वतःबद्दलचे असमाधानच पुरेसे असते. तसेच जर माझी फक्त स्वतः माझ्याशीच मैत्री झाली, तर स्वतःच्या प्रेमात पडणाऱ्या "नार्सिस'सारखी स्वतःची उपयुक्तता घालवून बसेन. टोकाचे आत्मप्रेम मला अहंकारी बनवेल.

मला माझ्या स्वतःबद्दल काय वाटते, हा मानसिक आरोग्यातील मूलभूत दृष्टिकोन आहे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकामध्ये काही प्रमाणात अपूर्णता असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची काही अंगे ही समाजमान्य कल्पनेत बसणारी नसतीलही; परंतु या कमतरतांचा न्यूनगंड न बाळगता केलेला डोळस स्वीकार महत्त्वाचा ठरतो. "डोळसपणे स्वीकार' हा वरकरणी सोपा पर्याय जरी वाटला, तरी तो प्रत्यक्षात अमलात आणणे सहजसोपे नाही. स्वतःबद्दल राग येणे, निराश वाटणे, आत्मविश्वास कमी होणे अश्‍या उंच लाटांचा सामना करावा लागेल; पण या कमतरता कमी करण्यासाठीचे यथाशक्ती प्रयत्न न सोडता; ते कमी करायचेच आहेत, असा अट्टाहास न करता स्वतःला वेळ देत खूप संयमाने हा प्रवास चालू ठेवावा लागणार आहे.

माझ्यातील अपूर्णतेचा स्वीकार मनोमन, स्थिर मनाने झाला, की पूर्णत्वाकडे नेणाऱ्या प्रवासामध्ये समरस होऊन जायचे. दुःख, अपयश यांचे क्षण येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहायचे; परंतु असे क्षण वाट्याला आले तरी त्यांचाही स्वीकार करायचा. आशावादी दृष्टिकोन ठेवायचा; परंतु त्याचा अतिरेक होऊन केवळ स्वप्नरंजनाच्या हिंदोळ्यावर हेलकावत खात न बसता वास्तववादी दृष्टिकोन ठेवून सतत जमिनीवर पाय रोवून राहणे महत्त्वाचे. "मी आहे तसा परफेक्‍ट आहे' असे म्हटले तर माझ्याच हाताने माझी विकासाची वाट बंद केल्यासारखे होईल. "मी अजिबात परफेक्‍ट नाही' हा टोकाचा विचार मला नैराश्‍याकडे नेईल. "मला परफेक्‍ट व्हायचे आहे' या विचारातून चिंता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच "आत्मस्वीकार व बदल' या प्रवासामध्ये स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने बघणे गरजेचे आहे. प्रत्येक पायरीवर स्वतःचे कडक मूल्यमापन करत बसल्यास हा प्रवास जिकिरीचा होऊन बसेल.

अर्थपूर्ण जगण्यासाठी माझ्या अपूर्णतेकडे कधी मायेने, कधी कडकपणे; परंतु ही अपूर्णता शंभर टक्के माझीच आहे या विश्वासाने पाहायला हवे. अपूर्णतेचा न्यूनगंड न बाळगता पूर्णत्वाचे काही क्षण जगता वा निर्माण करता आले याचा अहंकार मनात न येता जीवन गाणे गाता आले, तरच आपण याला आत्मस्वीकार असे म्हणू.

माझ्यात असे दोष असू शकतात, अशी सहिष्णुवृत्ती आली, तर इतरांमधील अपूर्णतेकडेसुद्धा मी "माझ्यासारखेच इतरही जणांमध्ये दोष असू शकतात' या दृष्टीने पाहू शकतो. स्वतःमधील व इतरांमधील अपूर्णतेचा स्वीकार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. माझे डोळस आत्मपरीक्षण सुरू राहिले, तर परिपूर्णत्वाच्या दिशेने माझा प्रवास अव्याहतपण सुरू राहील. या प्रयत्नांना काही वेळेस अपयशदेखील येऊ शकते; पण याक्षणी उद्‌ध्वस्त न होता प्रयत्नांचा पाठपुरावा सतत ठेवणे अगत्याचे राहील. आनंद, समाधान, सुख, शांती या भावना जशा माझ्या आहेत, तशाच राग, द्वेष, खंत, नैराश्‍य, भीती, चिंता यादेखील माझ्याच आहेत, हे सत्य स्वीकारणे अपरिहार्य राहील. एका पावलाची दुसऱ्या पावलाबरोबर मैत्री जमली, तरच प्रवास संपन्न होईल. निसटून गेलेला सूर पुन्हा गवसेल. जीवन गाणे पुन्हा एकदा नव्याने अर्थपूर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com