पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!

Startup Culture in Marathi
Startup Culture in Marathi

प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात. सगळेच ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात असेही नाही. पण म्हणून त्यांचे प्रयत्न कधीच थांबत नाही. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण स्वतःचे व्यवसाय सुरु करुन त्यांच्या मोठ्या स्वप्नांची बीजे रोवत आहेत. व्यवसाय सुरु करणे एवढे सोपे नाही. हा रस्ता प्रचंड संयम पाहणारा आणि कष्टदायक असतो. स्वतःच्या क्षमतेबद्द्ल मनात कितीही शंका डोकावून गेल्या तरी नेहमी प्रोत्साहीत राहून प्रयत्न करत राहायला हवे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या आपल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक तरुण तरुणी व्यवसायांद्वारे आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. 
 

डोमिनीक्स स्ट्रॅटेजिक डिझाईन
पुण्यातील 24 वर्षीय ध्रुव पाकणीकर या तरुणाने गेल्यावर्षी 'डोमिनीक्स स्ट्रॅटेजिक डिझाईन प्रा.लि' या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने वर्षभरातच डिझाईन क्षेत्रात सर्वत्र आपला ठसा उमटवला आहे. ध्रुवने एमआयटी इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनमध्ये पद्वीचे शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी एक प्रकल्प हाती घेतला. यात त्याने विशेष मुलांना त्यांचे हात इतर कामांसाठी सहजरित्या वापरता येईल असं उपकरण बनवलं. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व अन्य अनेक मोठ्या रुग्णालयात वापरलं जातं. शिक्षण घेत असतानाच ध्रुवने आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोलेक्स सारख्या इतर अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसिद्ध औद्योगिक डिझायनर करीम रशीद यांच्या न्युयॉर्कमधील ऑफिसमध्ये त्याला इंटर्नशिप मिळालं. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, आयल ऑफ दॅन आणि दुबईसारख्या मोठ्या देशांमध्ये काम करुनदेखील ध्रुव मात्र भारतात परतून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न मनात बाळगून होता. त्याच्या याच स्वप्नाला मेहनतीची साथ मिळाली आणि डोमिनीक्स स्ट्रॅटेजिक डिझाईनचा जन्म झाला. ध्रुव आणि त्याचा मित्र पंकज जाधवने फक्त एका लॅपटॉपवर व्यवसाय सुरु केला. ध्रुव आणि पंकजने सुरुवातीला रेखाचित्रांच्यामाध्यमातून संकल्पना तयार केल्या व त्या 'कम्पुटराईज्ड रेंडरिंग' द्वारे प्रत्यक्षात विकसित केल्या. आता दर महिन्याला त्यांच्याकडे किमान आठ ते दहा प्रकल्पांचं काम सुरु असतं. त्यांची कंपनी वर्षभरातच पुण्यातील नामांकित कंपन्यांच्या यादीत आली. त्यानंतर काही दिवसांमध्येच अमेरिका आणि इंग्लंडमधील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डोमिनीक्सने आयल ऑफ दॅन या देशात ऑफिस सुरु करुन आंतरराष्ट्रीय व्यवसायात पहिले पाऊल टाकलं. डोमिनीक्स सध्या 15 प्रकल्पांवर काम करत असून कंपनीने वर्षभरात साठहून अधिक ग्राहक आणि सत्तरहून जास्त प्रकल्प जोडले आहेत.
संपर्क: www.dominix.co

एक्सट्रिम ट्रेकर्स 
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कडेकपाऱ्या, लिंगाण्यासारखे थक्क् करणारे सुळके, सांधन व्हॅलीसारख्या खोल दऱ्या जिथं सुर्यप्रकाशसुद्धा क्वचितच पोहोचतो, कातळधर धबधब्यासारखे प्रचंड आवाज करत कोसळणारे धबधबे अशा ठिकाणी एकदातरी जाण्याची प्रत्येक गिर्यारोहकाची इच्छा असते, परंतू कामाच्या व्यापातून कित्येकदा हे शक्य होत नाही. प्रतिक खरडेकरने मात्र वयाच्या 19 व्या वर्षीच ट्रेकिंगची स्वतःचा व्यवसाय म्हणून निवड केली. सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या प्रतिकला लहानपणापासूनच ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. वयाच्या चौथ्यावर्षीच त्याने पहिला ट्रेक केला. आणि तिथूनचं त्याची ट्रेकिंगची गोडी वाढली. प्रतिकने 2010 मध्ये 'Not just the mountains, conquer the world' या ब्रीदवाक्यासह एक्सट्रिम ट्रेकर्सची स्थापना केली. एक्सट्रिम ट्रेकर्सतर्फे सात वर्षांत 30 मार्गदर्शकांसह दहा हजार गिर्यारोहकांची देशभरात 900 शिबिरं घेण्यात आली आहेत. प्रतिक तीन वेळा मृत्युच्या दाढेतून परत आला आहे मात्र त्याने अजूनही गिर्यारोहन कमी केलेले नाही. प्रतिक एकाचवेळी अनेक कामे करणाऱ्या आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. ''दररोजच्या कामाच्या व्यापात जमत नाही'', ''आधी बरेच पैसे कमवणार आणि मग निवृत्त झाल्यानंतर फिरायला जाणार'', अशी कारणे देणाऱ्या तसेच वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर जगभ्रमंती करण्याची स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी प्रतिक वयाच्या पंचविशीतच दोन्हींचा उत्तम समतोल राखून उत्तम उदाहरण देत आहे. 
संपर्क: 8149017580

ल्युमिनन्स प्रो सोल्युशन्स 
पुण्यातील व्हीआयटी(VIT) आणि व्हीआयआयटी(VIIT) कॉलेजच्या छतावर सध्या सुरु असलेला 250 केडब्लूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प हा पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या उपकरणाचा वापर म्हणजे सागाची तब्बल 12,300 झाडे आयुष्यभरासाठी जगवण्यासारखं आहे. यामुळे 7687.5 टन कार्बन उत्सर्जन रोखलं जाईल. या अनोख्या प्रकल्पाचं सारं जातं श्रेय व्हीआयटी कॉलेजचाच माजी विद्यार्थी विनीत परदेशी याला. विनीत परदेशी याने दोन वर्षांपुर्वी सुरु केलेल्या 'ल्युमिनन्स प्रो सोल्युशन्स' या व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे हा आहे. व्हीआयटी कॉलेजातून मेकॅनिकल इंजिनियरिंग व पुणे विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्याने काही फॉर्च्युन 500 यादीतील कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर विनीतने स्वत:चा सौरऊर्जेचा व्यवसाय सुरु केला. ल्युमिनन्स प्रो सोल्युशन्सकडून सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचा एकत्रितपणे वापर करुन वीजनिर्मिती करणारे यंत्र बनवले जाते. 
संपर्क: luminanceprosolutions@gmail.com

स्वप्नील लबडे                        
'सीओईपी'मधून नगर नियोजनासारख्या नवीन विषयात पदवी घेऊन या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वप्नीलने वयाच्या 22व्या वर्षीच स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं ठरवलं. या नवीन क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी त्याने माळीण गाव पुनर्वसनाच्या लेआऊट योजनेत हातभार लावला. यासाठी स्वप्नील आणि त्याचे दोन मित्र सलग दोन महिने काम करत होते. तब्बल 28 वेळा त्यांच्या योजना राज्य शहर नियोजन विभागाला पाठवल्यानंतर त्यांच्या नियोजनाला संमती देण्यात आली. देशातील सर्वात कमी कालावधीत म्हणजेच तीन वर्षात पूर्ण झालेला हा एकमेव पुर्नवसन प्रकल्प आहे. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना स्वप्नीलने काही निवडक कंपन्यांसोबत काम करुन अनुभव गोळा केला. तसेच 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' या स्पर्धेत तब्बल सहा हजार संघांमधून स्वप्नील व त्याचा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्यांनी 'प्रशासनातील लोकांचा सहभाग' या थिमअंतर्गत सर्वसामान्यांपर्यंत बजेट सोप्या पद्धतीने पोहचण्यासाठी अॅप तयार केलं. या अॅपमध्ये सामान्य माणसांना बजेट विषयी आपली मते मांडणे शक्य झाले. सध्या तो विविध शहरात नगर विकास आराखडा आणि शहर स्वच्छता योजनेचे काम करतो आहे. तो आता स्वत:ची नियोजन फर्म सुरु करण्याची तयारी करत असून, लवकरच त्याच्या फर्मची नावनोंदणी करणार आहे.
संपर्क: labdeswapnil@gmail.com

स्वीट अरोमा
लहानपणापासून एखाद्या गोष्टीबद्दल असलेल्या आवडीचे स्वतःच्या व्यवसायात रुपांतर करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वीट अरोमा’. लहानपणापासून केक तयार करण्याची आवड असलेल्या शिबानीने वयाच्या 13व्या वर्षी पहिला केक तयार केला. 22 वर्षीय शिबानीने डॉ. कलमाडी कॉलेजातून बी.कॉमची पद्वी घेऊनही आपली हीच आवड पुढेही जपत मागील वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला फक्त नातेवाईकांकडून मिळणारा प्रतिसाद शिबानीच्या उत्तम कामामुळे सर्वत्र पसरला. फेसबूक, इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर केलेल्या जाहिरातीमुळे स्वीट अरोमा सगळ्यांपर्यंत पोहचलं. स्वीट अरोमाची ख्याती आता एवढी वाढली आहे की नुकतेच शिबानीनं बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ पुण्यात आले असता त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा ‘कॉफी वॉलन्ट चॉको ड्रीप केक’ तयार करुन दिला. 
संपर्क: 8600101504

ट्रिशाज् बुटिक 
फॅशन डिसायनिंगचे क्षेत्र दिसते तेवढे सोपे कधीच नसते, त्यात  जेवढी प्रसिद्धी असते, त्याहून कितीतरी पट जास्त कष्ट असतात. लिबर्टी इन्सिट्युटमधून बेसिक कोर्स केलेल्या 25 वर्षीय धनश्री ठकारने या रोज बदलणाऱ्या आणि आव्हानात्मक क्षेत्रात ट्रिशाज् बुटिकच्या रुपाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नवीन गोष्टी शिकण्याची भूक असलेल्या धनश्रीने अनेक वेगवेगळे अडव्हान्स कोर्स केले. त्यानंतर एक वर्ष घरीच सराव केला. धनश्री आणि नूतनने अवघ्या 15 दिवसांच्या नियोजनाद्वारे तीन वर्षांपूर्वी (2014) स्वतःचे बुटीक सुरु केले. सध्या मार्केटयार्ड-कोंढवा रोडवरील ‘लाईट हाऊस’ या मॉलमध्ये त्यांचे बुटीक आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम म्हटले की सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं ते पोषाखाला. आणि ट्रिशाज बुटीकद्वारे धनश्री आणि नूतन आपले हेच क्षण अनमोल आणि विस्मरणीय करण्याचे काम करतात. 
संपर्क: 8551079590

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com