‘आहिताग्नी’ राजवाडे (सदानंद मोरे)

4dec2016-rajwade
4dec2016-rajwade

ता. २७ नोव्हेंबर हा ‘आहिताग्नी’ शंकर रामचंद्र राजवाडे यांचा मृत्युदिन. सन १९५२ मध्ये याच दिवशी ते कालवश झाले. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीसमोरच्या रस्त्यावरच्या एका वास्तूत राहत. तिथंच ते अग्निहोत्र चालवत. म्हणजे अग्नी २४ तास प्रज्वलित ठेवून त्यात नियमितपणे आहुती देण्याचं नित्यकर्म करत. अशा व्यक्तीला ‘आहिताग्नी’ असं म्हटलं जातं. मात्र, आहिताग्नी राजवाड्यांच्या अग्निमंदिरात आग्निहोत्राखेरीज आणखीही काही गोष्टी चालत. दरवर्षी नवरात्राच्या निमित्तानं ते शारदीय व्याख्यानमालेचे ज्ञानसत्र चालवत. या ज्ञानसत्रासाठी ते आपल्यापेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्यांनाही निमंत्रित करत असत.

त्यांच्या या ज्ञानसत्रामुळंच मला त्यांची अगदी लहानपणीच माहिती झाली. आचार्य अत्रे यांच्या आत्मवृत्तात ती माहिती होती. एकदा आहिताग्नींनी अत्रे यांना व्याख्यान द्यायला बोलावलं. अत्रे म्हणजे त्या काळचे पुरोगामी व सुधारणावादी. आहिताग्नी याबाबतीत प्रतिगामी म्हणता येतील, अशा जुन्या वळणाचे; पण तरीही ते वादविवादाचे, वैचारिक देवाणघेवाणीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बोलावलं व अत्रेही गेलेच. त्या अनुभवाचं वर्णन करताना अत्रे यांनी ‘आहिताग्नींच्या गुहेत’ असा शब्दप्रयोग केलेला आठवतो.

आहिताग्नींनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी त्यांनी लिहिलेल्या ‘गीताभाष्या’ला या वर्षी १०० वर्षं पूर्ण झाली. या शताब्दीचं निमित्त साधून त्यांच्या परिवारातल्या मंडळींनी एका संकेतस्थळाची निर्मिती करून अभ्यासकांची महत्त्वाची सोय केली आहे. त्या संकेतस्थळाचं उद्‌घाटन नुकतंच झालं. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. राजा दीक्षित व प्रा. मंगेश कुलकर्णी या ख्यातनाम अभ्यासकांची भाषणंही झाली. आहिताग्नींची ग्रंथसंपदा पाहिल्याशिवाय एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध समजून घेणं अशक्‍यप्राय आहे.

अत्रे यांनी वर्णन केलेल्या त्या ‘गुहे’त शिरण्याचा योग मला मी सातव्या इयत्तेत असताना आला. तेव्हाची सातवी म्हणजे व्हर्नाक्‍युलर फायनल. या परीक्षेला महत्त्व असायचं. परीक्षा द्यायला केंद्रात जावं लागे. आमच्या देहू इथल्या प्राथमिक शाळेचं परीक्षा केंद्र पुण्यातलं भावे हायस्कूल हे होतं. आम्हा सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळातली राहायची सोय आमच्या शाळेनं भावे हायस्कूलजवळच्या राजवाडे मंगल कार्यालयात केली होती. राजवाड्यांच्या वास्तूचं आता कार्यालयात रूपांतर झालं होतं. ज्या वास्तूच्या भिंतींनी अनेक विद्वानांची व्याख्यानं ऐकली, तिच्यात आठवडाभर वास्तव्य करायला मिळालं, याबद्दल मला धन्य वाटते. - माझा अनुभव माझ्या सहाध्यायांच्या बरोबर ‘शेअर’ करायची सोय नव्हतीच. परीक्षा संपवून घरी आल्यावर मात्र वडिलांशी बोललो. त्यावर त्यांनी स्वतःही त्यांच्या पुण्यातल्या विद्यार्थिदशेत अशी काही व्याख्यानं तिथं ऐकल्याचं सांगितलं. अशा व्याख्यांनाचा समारोप स्वतः राजवाडेच करत असत. ते त्या व्याख्यानमालेचे पदसिद्ध अध्यक्षच असत, असं म्हटलं तरी चालेल. वसंत व्याख्यानमालेशी स्पर्धा करणारं हे ज्ञानसत्र असे.
सन १९८० च्या दरम्यान पुण्यातल्या श्रीविद्या प्रकाशनानं आहिताग्नींचं आत्मवृत्त प्रकाशित केलं आणि माझ्यासारख्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासकाला एक खजिनाच खुला झाला. 

‘आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त’ असंच नाव असलेल्या त्या ग्रंथातली राडवाड्यांची मतं आजच्या काळात कुणाला पटण्याची शक्‍यता फारच कमी आहे. मलाही ती पटत नव्हतीच; पण त्यानिमित्तानं तो सगळा काळ, त्या काळची मत-मतांतरं, वादविवाद व स्पर्धासंघर्ष यांच्यासह डोळ्यांसमोर साक्षात होतो, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. विशेषतः आधुनिक काळातल्या पुरोगामी सुधारणा मान्य नसणाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय होतं, हे त्यामुळं लक्षात येतं. ते समजलं नाही तर ती चर्चा व तो संघर्षही समजणार नाहीच.

जीर्णमतवादाचं समर्थन करणारे इतर शास्त्री-पंडित त्या काळात नव्हते, अशातला भाग नाही; तसंच त्यांचं लेखन मुदलातच उपलब्ध नाही असंही नाही; पण या मंडळींना आधुनिक विद्यांचं ज्ञान नसे. किंबहुना त्यांना आधुनिक पाश्‍चात्य ज्ञानाविषयी तुच्छताबुद्धी व तिटकारा होता, असं म्हणायलाही हरकत नव्हती. राजवाड्यांचं तसं नव्हतं. ते परंपरेची मांडणी आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या चौकटीत करत. त्यामुळे शास्त्री-पंडितांना वळसा घालून पुढं गेलं तर फारसं बिघडत नाही. मात्र असं राजवाड्यांच्या बाबतीत करता येत नाही. राजवाडे हे पारंपरिक विचार व आचार आधुनिक चौकटीत मांडूनच थांबत नाहीत; तर ते आधुनिक आचार-विचारांपेक्षा कसे उच्चतर आहेत हेही दाखवतात !

आहिताग्नींचं आत्मवृत्त प्रकाशित झाल्यानंतर विश्राम बेडेकर यांचं टिळक आणि आगरकर हे नाटक आलं. नाटकाच्या प्रस्तावनेत बेडेकरांनी, आपण आगरकरांचे चाहते असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात नाटक टिळकांकडं झुकतं असणारं होतं. इतकेच नव्हे तर, डॉ. य. दि. फडके यांनी म्हटल्याप्रमाणे, नाटकात आगरकरांचं चित्रण हिणकस उतरलं होतं.

फडके हे त्या काळातले अव्वल दर्जाचे प्रस्थापित संशोधक होते. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. विशेष म्हणजे, त्यांचा समकालीन अस्सल साधनांवर भर असायचा.

दरम्यान, मीही ‘टिळक आणि आगरकर’चं परीक्षण केले. त्यातले बरेचसे निष्कर्ष हे फडके यांच्या निष्कर्षांशी मिळतेजुळते होते. ते पाहून फडके यांना आश्‍चर्य याचं वाटलं, की त्यांनी अस्सल कागदपत्रं पाहून केलेल्या विवेचनाशी माझ्यासारख्या नवख्या व मुख्य म्हणजे, अशा प्रकारच्या साधनांची उपलब्धता होण्याची शक्‍यता नसलेल्या (मी तेव्हा नगर इथल्या कॉलेजात प्राध्यापक होतो) व्यक्तीनं इतकं बरोबर लिहिलं कसं? त्यांच्या या आश्‍चर्याला अर्थातच कौतुकाची झालर होती. त्यांनी मला भेटायला बोलावलं. (तेव्हा ते पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते). मी गेलो. आमच्या गप्पा झाल्या व सूर जुळले.

माझ्या परीक्षणाचं रहस्य असं काही नव्हतंच! मी आहिताग्नींचं आत्मवृत्त वाचून रिकाम्या जागा अक्कलहुशारीनं भरून काढल्या होत्या! स्वतः फडके हेही आहिताग्नींच्या आत्मवृत्तावर बेहद्द खूश होते.

पुढं तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा विद्यार्थी या नात्यानं आहिताग्नींमधली माझी रुची वाढतच गेली. तत्त्वज्ञानाच्या बाबतीत आणखी एक कारण होतं. ज्यांना आपण ‘भारतीय विचारपरंपरेतली सहा दर्शनं’ म्हणतो, त्यांच्यातल्या अनेकांना आधुनिक काळातही अभ्यासक, वाली आणि समर्थक लाभले होते. सगळ्यात जास्त अद्वैत वेदान्ताला किंवा उत्तरमीमांसेला. न्यायदर्शनात तर्कशास्त्र आणि पद्धतिशास्त्र असल्यानं त्यांचा अभ्यासही होत असे. पूर्वमीमांसेला मात्र कुणी वाली नव्हता. आहिताग्नींचं महत्त्व यासाठी, की ते पूर्वमीमांसकांचे प्रवक्ते बनले व त्यांनी मीमांसेचा किल्ला लढवला व तोही विचारांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या व हत्यारांच्या साह्यानं. त्यांना प्रतिकार करायला कुणी पुढं सरसावण्याची शक्‍यता तशी कमीच होती. ते उपेक्षित वा दुर्लक्षित राहायचे. कारण, हेच की त्यांच्या परंपरेतल्या विरोधकांना आधुनिकतेचं ज्ञान नव्हतं व आधुनिक तर परंपरेच्या नावानं केव्हाच आंघोळ करून मोकळे झालेले!
राजवाड्यांच्या पुस्तकांच्या आणि इतरही अनेक बाबींच्या प्रसिद्धीसंबंधी ठाम विधानं करता येत नाहीत. भाकीत करणं तर फारच अवघड. आता हेच पाहा ना, आहिताग्नी राजवाडे यांनी लिहिलेल्या ‘गीताभाष्या’ला १०० वर्षं झाली. १९१६ मध्ये ते प्रकाशित झालं होतं; पण महाराष्ट्रात गीतेसंबंधी जी चर्चा होते - आणि ती नेहमी होतच असते - तिच्यात आहिताग्नींच्या मतांचा उल्लेख कुणीही करताना दिसत नाही. याचं एक कारण ‘त्या पुस्तकाची कठीणता आहे,’ असं कुणी म्हणेल. हे कारण नाकारायचं काही कारण नाही; पण त्यामुळं त्यातल्या मतांची चर्चा होणार नाही. पण इथं तर त्या पुस्तकाचीही स्मृती कुणाला नाही. असं का?

इथं एका व्यावहारिक मुद्द्याची दखल घ्यावी लागते. सन १९१५ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं ‘गीतारहस्य’ प्रकाशित झालं. त्यानंतर किमान २५ वर्षं तरी त्या ग्रंथाची गडद छाप महाराष्ट्राच्या विचारविश्‍वावर पडलेली दिसून येते. त्याची कारणं शोधायची ही जागा नव्हे. मुद्दा हा आहे की ‘गीतारहस्या’च्या चर्चेत अडकलेला महाराष्ट्र गीतेसंबंधी आणखी कुणाच्या ग्रंथाची दखल घेणं शक्‍यच नव्हतं. स्वतः टिळकांचा वैयक्तिक महिमा व प्रतिमा तशी होती व ग्रंथही त्या दर्जाचा होता. या पार्श्‍वभूमीवर राजवाड्यांनी ग्रंथ प्रसिद्ध करायची घाई करायला नको होती. ‘आपल्या ग्रंथाची चर्चा गीतारहस्याच्या संदर्भात होईल व राजवाडे हे टिळकांच्याही पुढं गेले आहेत, असं लोकांना वाटेल,’ असा जर राजवाड्यांचा समज तेव्हा झालेला असेल तर ती त्यांची चूकच म्हणावी लागेल. याउलट ‘टिळकांपेक्षा हे आणखी काय वेगळं सांगणार आहेत,’ असंच लोकांना वाटलं असणार.

समकालीन इतर विचारवंतांपेक्षा राजवाड्यांचं वेगळेपण कशात होतं, हे समजून घ्यायला राजवाड्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली याची माहिती करून घ्यायला हवी. राजवाडे हे पहिल्यापासून जबरदस्त वाचक होते. त्यांच्या जडणघडणीचा काळ हा चिपळूणकर आणि टिळक यांच्या राष्ट्रीय विचारांच्या प्रभावाचा होता. टिळकांच्या उपक्रमशीलतेमुळं गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू झाले. त्यातून मेळ्याची कल्पना पुढं आली. स्वतः राजवाडे सन्मित्र मेळ्याच्या आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक होते. ते मेळ्यासाठी प्रक्षोभक पदं लिहीत असत. पुण्यातल्या प्लेगच्या साथीत जुलमी अधिकारी म्हणून चर्चेत आलेल्या रॅंडचा वध करणारे चापेकर बंधू व त्यांना पकडून देणारे द्रविड बंधू यांच्याशी राजवाड्यांचे जवळचे संबंध होते. देशासाठी फाशी जाणाऱ्या चापेकरांबद्दल त्यांना इतका आदर व प्रेम होतं, की चापेकर फाशी गेल्यानंतर आलेल्या प्रत्येक वर्षीच्या श्राद्धपक्षात राजवाडे हे आपल्या पूर्वजांबरोबर चापेकर बंधूंनाही तर्पण करत!

परंपरेत ज्यांना ‘सर्वतंत्र स्वतंत्र’ असं म्हणण्यात येतं, त्या कोटीत बसणारं राजवाडे हे दुर्मिळ व्यक्तित्त्व होतं. कुणाची कसलीही पर्वा न करता आपल्याला योग्य वाटतं ते बोलायचं व मांडायचं हा त्यांचा बाणा होता. त्यामुळं कुणाला काय वाटेल, त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल, याची त्यांना तमा नसे. ते प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे विचारवंत होते. तरुण सुशिक्षितांनी मान्य केलेले जॉन स्टुअर्ट मिल व जर्मी बेंथाम हे उपयुक्ततावादी विचारवंत त्यांना कधीच भावले नाहीत. या विचारवंतांना वाट पुसतच महाराष्ट्रातल्या शिक्षित मध्यमवर्गाची वाटचाल होऊ लागली होती. गोपाळ गणेश आगरकर या वर्गाचे वैचारिक नेते होते. परंपरा व रूढी यांच्यावर टीका करत हा वर्ग जातिभेदनिवारण, स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार व प्रसार करत होता. राजवाड्यांना अशा रूढी-परंपरांसकट धर्म टिकवायचा होता. मात्र, त्यासाठी वेदांमधल्या व धर्मशास्त्रांमधल्या वचनांचा आधार घेण्याऐवजी ते त्याऐवजी पाश्‍चात्य विचारवंतांचे दाखले देत.
सुरवातीच्या काळात चिपळूणकरांच्या प्रभावाखाली असलेल्या राजवाड्यांनी महादेव मोरेश्‍वर कुंटे यांचे ग्रंथ वाचले व ते त्या प्रभावातून मुक्त झाले. कुंटे यांच्यापुढं त्यांना चिपळूणकर खुजे वाटू लागले.

मात्र, राजवाडे हे ‘राजवाडे’ झाले, याचं खरं श्रेय जातं ते त्यांचे डेक्कन कॉलेजमधले गुरू प्राचार्य डब्ल्यू. एफ. बेन यांच्याकडं. वंशानं आयरिश असलेले बेन यांना आतून भारतीय ज्ञानपरंपरेविषयी व अनुषंगानं भारतीय स्वातंत्र्यलढ्याविषयी आस्था होती, सहानुभूतीही होती. बेन ॲरिस्टॉटलवादी असून, कोंन, मिल, बेंथाम, कांट अशा पाश्‍चात्य तत्त्वज्ञांचे ते विरोधक होते. त्यांची मतं आधुनिकतेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिगामी म्हणावीत अशीच होती. वैदिक परंपरेची मांडणी आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या भाषेत व चौकटीत कशी करायची व त्याचप्रमाणे तिचं समर्थन करत तिचं श्रेष्ठत्व कसं प्रस्थापित करायचं त्याची ‘मेथड’ राजवाड्यांनी बेन यांच्या संस्कारातून विकसित केली. गुरुदेव रा. द. रानडे, कादंबरीकार र. वा. दिघे, लेखक स. आ. जोगळेकर अशा बेन यांच्या तालमीत तयार झालेल्या इतर शिष्यांची नावं यासंदर्भात सांगायला हरकत नसावी. ॲरिस्टॉटलवादी असल्यामुळंच बेन यांनी मार्क्‍स यांचा आर्थिक सिद्धान्तच काय; परंतु आईन्स्टाईन यांची सापेक्षतासुद्धा नाकारली.

परंपरेचे इतके कट्टर समर्थक असलेले आहिताग्नी यांना परंपरावाद्यांचं पुढारपण का मिळालं नाही, याचीही चर्चा करायला हवी. राजवाडे ज्या भूमिकेवरून परंपरेचं समर्थन करत होते, ती भूमिका पूर्वमीमांसकाची होती. वैदिकधर्मीयांच्या विद्यमान परंपरेतला मुख्य प्रवाह हा शंकराचार्यांचा अद्वैत वेदान्ती विचार असून, हा विचारच पूर्वमीमांसेच्या विरोधात उदयाला आला. त्यामुळं शंकराचार्य हे राजवाड्यांचे क्रमांक एकचे प्रतिस्पर्धी ठरले. खुद्द टिळकांनीसुद्धा आपला शंकराचार्यांचा विरोध गीतेपुरता मर्यादित ठेवला. शंकराचार्यांच्या मायावादी अध्यात्माला त्यांनी हात लावला नाही. याउलट राजवाड्यांनी शंकराचार्यांच्या ईशावास्योपनिषदभाष्यावर चौफेर हल्ला चढवला. ‘शंकराचार्यांनी उपनिषदांचा चुकीचा अर्थ लावला,’ एवढंच सांगून राजवाडे थांबले नाहीत, तर ‘शंकराचार्यांनी मूळ पाठात फेरफार केले,’ असा गंभीर आरोपही राजवाड्यांनी केला.
मात्र, हा झाला तात्त्विक मुद्दा. राजकीय व्यवहाराकडं पाहिलं तरीही असाच प्रकार आढळून येतो. राजवाड्यांनी  संघ आणि हिंदू महासभा यांच्याही मर्यादा दाखवून दिल्या. सावरकर व गांधीजी यांची तुलना करताना त्यांनी जे लिहिलं आहे, ते वाचून तर सावरकरवादी मूर्च्छितच व्हावेत! आता अशा माणसाला हिंदुत्ववादी आपला नेता म्हणून कसे स्वीकारणार ?

आहिताग्नींचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे त्यांनी लिहिलेलं ऋग्वेदातल्या नासदीय सूक्तावरचं भाष्य. त्यात काय विशेष असे एखाद्याला वाटेल. नासदीय सूक्तावरचं राजवाडेकृत हे भाष्य म्हणजे, भारतीय कामशास्त्राचं स्वतंत्र विवेचन आहे. विशेष म्हणजे, हे विवेचन त्यांनी पाश्‍चात्य कामवेत्त्यांच्या संदर्भात केलेलं आहे. एलिस हॅवलॉक, सिग्नर, फ्रॉईड या सगळ्यांचे संदर्भ या ग्रंथात आढळून येतात.
राजवाड्यांनी जी तात्त्विक चौकट स्वीकारली, ती मुख्य प्रवाहातलं अद्वैत नसून, ज्याला ते निर्द्वंद्व म्हणतात ते तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मूळ वैदिक तत्त्वज्ञान हे द्वंद्वात्मक असून, निर्द्वंद्व अवस्था हे त्याचं उद्दिष्ट आहे. द्वैत व अद्वैत या संकल्पना नंतरच्याच काळातले प्रक्षेप आहेत.

आहिताग्नी राजवाडे यांचे विचार पटले नाहीत, तर काही बिघडणार नाही. मात्र, त्यांची जिज्ञासू व चौकस वृत्ती, त्यांची ज्ञानपिपासू, स्वतंत्र व निर्भीड विचारपद्धती, निःस्पृहता कोणत्याही विचारसरणीच्या सुज्ञ माणसाला भुरळ पाडील, अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com