|| नथुरामची मनोवृत्ती व सावरकरांवरील हल्ला ||

प्रा. संतोष शेलार
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

एकुणातच असे दिसते की नथुराम अगदीच "सनकी' (इन्सेन) मनुष्य असावा. "नवभारत'चे संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी नथुरामचे वर्णन "लखोटबंद व कुढ्या मनोवृत्ती'चा असं केलं आहे. खरं म्हणजे नथुरामला सावरकरांविषयी खूप आदर होता. त्याच्या वर्तमानपत्रावर सावरकरांचे छायाचित्रही झळकत असे. तरीही तो सावरकरांवर हल्ला करू शकतो. मग अशा माणसाने म. गांधीजींची हत्या करावी यात कसलेच आश्‍चर्य नाही

नथुराम आणि गांधी-हत्या हा न संपणारा विषय आहे. या विषयात नवे नवे ग्रंथ येत आहेत व त्यातून माहिती आणि अन्वयार्थ याची नवनवीन भर पडतच आहे. या बाबतीत नथुराम गोडसे यांच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडेल, अशी एक आठवण एका गृहस्थांनी सांगितली आहे.

पुणे येथे डॉ. स. ह. देशपांडे यांनी "राष्ट्रवाद अभ्यास मंडळ' नावाचा चर्चा करणारा गट स्थापन केला होता. प्रथम कुणाचे तरी व्याख्यान होत असे. (वक्ता हा शक्‍यतो बाहेरचा असे) व्याख्यानानंतर त्यावर प्रश्नोत्तरे, असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप असे. तिथे एक मुकुंद सहस्रबुद्धे नावाचे गृहस्थ येत. त्यांना काही काळ सावरकरांचा सहवास लाभला होता. त्यांनी सांगितलेली आठवण अशी -

स्वातंत्र्य मिळाल्यावर सुमारे 4-5 दिवसांत शनिवारवाड्यापुढे सावरकरांची एक सभा झाली. सभेला लोक तसे कमीच होते. त्या सभेत सावरकरांनी त्यांची नेहमीची भूमिका मांडली. "जरी अखंड हिंदुस्थान आपले ध्येय असले तरी सध्या तीन चतुर्थांश भारत आता मुक्त झाला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. आपण सर्वांनी हे स्वातंत्र्य टिकवले पाहिजे व नव्या सरकारला सहकार्यही केले पाहिजे.' इ.
भाषण झाल्यानंतर सावरकर व्यासपीठावरून खाली उतरले. अनौपचारिक गप्पांना सुरुवात झाली. त्यात नथुराम गोडसे यांनी त्यांच्याशी या मुद्द्याबाबत वाद घातला. वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले. शेवटी भांडण या स्तरापर्यंत गेलं की नथुराम सावरकरांच्या अंगावर धाउन गेले. लोकांनी त्यास धरले. अन्यथा अतिप्रसंग झाला असता.

सहस्रबुद्धे यांच्याकडून ही आठवण मी "राष्ट्रवाद अभ्यास मंडळा'त दोन वेळा ऐकली आहे. अर्थातच इतरही वीस पंचवीस सदस्य हजर होते. ही घटना कोणत्याही सावरकर चरित्रात आलेली नाही.

इतिहास-लेखन-शास्त्राच्या दृष्टीने पाहता समकालीन व जवळच्या व्यक्तींची आठवण हा सुद्धा अर्थातच महत्त्वाचा पुरावा असतो. या आठवणीस पाठिंबा देणारा इतर काही प्रत्यंतर पुरावा मिळाला तर त्या घटितास बळकटी येते. त्या दृष्टीने तत्कालीन पंचवीस-तीस दिवसांची (तत्कालीन) वृत्तपत्रे चाळून बघायला हवीत. कदाचित प्रत्यंतर पुरावा मिळू शकेल. सहस्रबुद्धे यांच्याकडे अशा बऱ्याच आठवणी होत्या. स. ह. देशपांडे यांनी त्यांना लिहायला सुचवले होते. पण त्यांनी त्या लिहिल्या नाहीत. आता तर दोघेही हयात नाहीत. असो.

अजून एक प्रसंग म्हणजे नथुरामने हिंदुमहासभेचे अध्यक्ष भोपटकर यांच्यावरही चाकुच्या सहाय्याने हल्ला केला होता. गांधी-हत्येनंतर जे साक्षी-पुरावे मांडले गेले, त्यात ही गोष्ट समोर आली होती.

एकुणातच असे दिसते की नथुराम अगदीच "सनकी' (इन्सेन) मनुष्य असावा. "नवभारत'चे संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी नथुरामचे वर्णन "लखोटबंद व कुढ्या मनोवृत्ती'चा असं केलं आहे. खरं म्हणजे नथुरामला सावरकरांविषयी खूप आदर होता. त्याच्या वर्तमानपत्रावर सावरकरांचे छायाचित्रही झळकत असे. तरीही तो सावरकरांवर हल्ला करू शकतो. मग अशा माणसाने म. गांधीजींची हत्या करावी यात कसलेच आश्‍चर्य नाही.

आत्यंतिक (एक्‍सट्रिमिस्ट) विचार करणाऱ्या व्यक्ती या एका मर्यादेपलीकडे आपल्या वर्तनाभोवती सभ्यतेचे कोंदण राखू शकत नाहीत, हेच या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल...

(लेखक इतिहासाचे प्राध्यापक आहेत)

Web Title: santosh shelar writes about nathuram