Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

कुठल्याही क्षणी गाता आलं पाहिजे (मंजूषा पाटील)

पहाटे पाच वाजता पंडित काणेबुवांचं गायन झालं. त्यांच्या गायनानंतर त्यांनी मला उठवलं व म्हणाले ः ''चल, आता तुला गायचं आहे.'' मी असं अचानकपणे गायलेदेखील. 'कोणत्याही क्षणी मी गाऊ शकते की नाही,' याचीच ती खरंतर परीक्षा होती! 'कधीही ठरवून गायचं नाही,' असा काणेबुवांचा आग्रहच असे. 


माझ्या आई-वडिलांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती; त्यामुळेच आमच्या सांगलीच्या घरात छान सांगीतिक वातावरण होतं. माझे आई-वडील (विद्याधर व सुनीता कुलकर्णी ) मला अनेक कलाकारांच्या मैफली ऐकण्यास आवर्जून नेत असत. सुरवातीला मी 'कथक' शिकायला जात असे; नंतर काय झालं माहीत नाही, आई-वडिलांनी मला शास्त्रीय संगीत शिकवण्याचा विचार पक्का केला. यानंतर मी पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडं शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करवून घेण्यासाठी ते त्या काळात प्रसिद्ध होते. प्रारंभीची दोन-तीन वर्षं शिक्षण झाल्यानंतर मी भावगीत-अभंग-शास्त्रीय संगीत यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. अशाच एका स्पर्धेत पंडित दत्तात्रेय विष्णू काणेबुवा परीक्षक म्हणून होते. मी या स्पर्धेसाठी 'रूपबली तो नरशार्दूल साचा' हे नाट्यगीत निवडलं होतं. परीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या बुवांनी मला पहिल्या फेरीनंतर योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या. परिणामी, या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. या घटनेनंतर माझे वडील पं. काणेबुवांना भेटले व म्हणाले : 'तुम्ही माझ्या मुलीला दत्तक घ्या'. 

'मी माझ्या मुलीला तुमच्याकडं सोपवत असून, तुम्ही तिचा पूर्णतः स्वीकार करून तिला घडवा,' असा वडिलांच्या त्या वाक्‍याचा भावार्थ होता. 

शिष्य ज्या वेळी गुरूच्या पायाशी लीन होतो, त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याला विद्या अवगत होते. वडिलांची ही विनंती मान्य करून बुवांनी मला सांगीतिक शिक्षण द्यायला सुरवात केली. याचदरम्यान मी रेखाताई देशपांडे यांच्याकडंही एक वर्ष तालीम घेतली. मात्र, त्यानंतर फक्त बुवांकडंच मी शिकले. 

पहिल्या तीन वर्षांत साधारणतः तीन राग मी शिकले. गळ्यावर सगळ्या प्रकारचे संस्कार होण्यासाठी बुवांनी मला या काळात बालगंधर्वांची व मास्टर कृष्णराव यांची काही नाट्यगीतं, भजनंदेखील शिकवली. 'प्रत्येक गवयाचं गाणं चांगलंच असतं, म्हणून आपण एकाच घराण्याच्या चौकटीत अडकून पडायचं नाही,' अशा विचारानुसार बुवांनी आम्हाला अब्दुल करीम खॉं, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व, हिराबाई बडोदेकर यांचं गाणं सतत ऐकवलं. याचे सांगीतिक संस्कार माझ्यावर नकळत होत गेले. सध्या मी 'जोहार मायबाप', 'श्रीरंगा', 'अवघाचि संसार' ही गाणी गाते ते केवळ बुवांमुळंच.

गुरुकुल पद्धतीनं मी बुवांकडं 13 वर्षं शिकले. त्यांची शिकवण्याची हातोटी आगळी होती. ते इचलकरंजीला राहत असत. मी शाळा-कॉलेजनंतर रोज दुपारी एसटी गाडीनं इचलकरंजीला जायची, तर शुक्रवार ते रविवार तिकडं मुक्काम करायची. या तिन्ही दिवसांत तिन्हीत्रिकाळ तालीम चालायची. रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला मी इतर शिष्यांबरोबरच तालमीला एकत्रित बसायची. सकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्यांचं गायन चालायचं. यामुळं मला विविध राग-रागिण्यांची ओळख होत गेली. या वेळी सतत सात-आठ तास तानपुरा वाजवण्याची जबाबदारी माझ्याकडं असायची. याव्यतिरिक्त बुवा मला स्वतंत्रपणे दोन-तीन तास शिकवत असत. 'रागसंगीत' झटपट येऊ शकत नाही, त्यासाठी प्रचंड साधना हाच उपाय आहे, हे माझ्या लक्षात आलं. 

पहाटे पाच वाजता उठून माझा गाण्याचा रियाज सुरू होत असे. कित्येकदा गाढ झोप लागलेली असायची; परंतु रियाजाचा खाडा होऊ नये यादृष्टीनं आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. पहाटेच्या रियाजात स्वराभ्यास प्राधान्यानं असायचा. आपण याला 'सूरसाधना' किंवा 'स्वरसाधना' म्हणू या. शुद्ध स्वरांची (सप्तक) आवाजसाधना महत्त्वाची होती, तर दुपारी व रात्री फक्त रागांचा रियाज चालत असे. यात एखाद्या प्रचलित रागाचा समावेश असायचा.

गाणं हे तालात होण्याच्या दृष्टीनं माझी अगदी सुरवातीपासून तबल्याच्या साथीत तालीम झाली. माझ्या धाकट्या बहिणीनं (संजीवनी) मला लहानपणापासून आजपर्यंत तबलासाथ केली. त्यामुळं माझा ताल पक्का झाला. मशिनवरचा तबला मी कधी साथीला घेतला नाही. बंदिश तालात (आवर्तनात भरण्याचा) बसवण्याचा रियाजही मी करायची. आग्रा-ग्वाल्हेर घराण्याची लयकारी किंवा बोलबनाव यांचा रियाज कायम तालाबरोबरच झाला. 

माझं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर, मी शास्त्रीय संगीताला पूर्ण वेळ वाहून घेतलं. बुवांनी मला नुसतं गाणंच शिकवलं असं नाही, तर मैफलसादरीकरणाचं तंत्र शिकवण्यासाठीही त्यांनी खास मेहनत घेतली. एवढंच नव्हे तर, मला अनुभव मिळण्यासाठी बुवांनी काही कार्यक्रमदेखील आयोजित केले. सन 1993 मध्ये 'औंध संगीत महोत्सवा'त बुवांचा सत्कार होता. या महोत्सवात पहाटे पाच वाजता बुवांनी मला गाण्यासाठी उठवलं. मी असं अचानकपणे गायलेदेखील. कोणत्याही क्षणी मी गाऊ शकते की नाही, याचीच खरं तर ती परीक्षा होती! 'कधीही ठरवून गायचं नाही,' असा बुवांचा आग्रहच असे. तेव्हापासून ते परवाच्या माझ्या बडोद्याच्या मैफलीपर्यंत, काय गायचं हे मी 'ग्रीनरूम'मध्येच ठरवत आले आहे. 'ठराविक कार्यक्रमांसाठी ठराविक रागांचा सराव' असं मी केल्याचं मला आठवत नाही. कारण, एखाद्या कार्यक्रमात आधीच्या कलाकारानं कोणता राग गायला आहे, त्याला अनुसरून आपलं गाणं होणं गरजेचं असतं. आपली मैफल रंगण्याच्या दृष्टीनं कलाकारानं या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं. 

पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त डोंबिवलीला लीलाताई करंबेळकर यांच्या घरी कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या प्रसंगी काणेबुवांनी त्यांच्या गायनापूर्वी मला गायनाची संधी दिली. त्या वेळी माणिक वर्मा, व्यासबुवा, भाई गायतोंडे असे मान्यवर उपस्थित होते. एकदा डॉ. अशोक दा. रानडे लावणीचा कार्यक्रम करणार होते. त्या वेळी त्यांनी मला गाण्यासाठी बोलावलं. बुवा मला परवानगी देताना म्हणाले : ''त्यांच्याकडून तू अजून काही सांगीतिक प्रकारही शिकून घे.'' 

आनंदाची गोष्ट म्हणजे, पुढं तसा भाग्ययोग प्रत्यक्षात आला. 

'सुध बानी, सुध मुद्रा' हा मला मिळालेला आणखी एक मंत्र. मंच हे आपण केलेले कष्ट दाखवण्याचं ठिकाण नसून, आनंद देण्याचं ठिकाण आहे; मग तुम्ही खर्जात गात असा किंवा तारसप्तकात. कलाकारानं साथसंगतकारांशी उचित संवाद साधत प्रसन्न मुद्रेनंच गायला हवं. थोडक्‍यात, रसिक-श्रोते गाणं 'पाहून व ऐकून' प्रसन्न झाले पाहिजेत आणि कलाकारालादेखील सादरीकरण सुरू असताना आनंद वाटला पाहिजे. मैफल सादर करताना; विशेषतः गायिकेनं कसं बोलावं, कसं वागावं, मंचावरचं तिचं वावरणं कसं असावं, या महत्त्वाच्या गोष्टींचं ज्ञान मला बुवांनी आवर्जून दिलं. कित्येकदा मी मंचावर तानपुरे जुळवून बसल्यानंतर, बुवा मला, कोणता राग गायचा आहे, हे सांगायचे. 'जे राग तुम्ही शिकला आहात ते सगळेच्या सगळे तुमच्या गळ्यावर कोरले गेलेलेच असले पाहिजेत,' असा बुवांचा कटाक्ष असायचा. अनेक बंदिशी माझ्या मुखोद्गतच होत्या. बंदिशी, पलटे, रागांचं चलन, राग-रागिण्या या माझ्याकडून अगदी घोटवून व रटून घेतल्या गेल्या आहेत. 

माझी पहिली व्यावसायिक गाण्याची मैफल कधी झाली, याविषयी सांगितलं तर काहीसं नवल वाटू शकेल. कारण, अगदी लहान वयातच अक्कलकोट इथं श्रीस्वामी समर्थांच्या दरबारात माझी पहिली व्यावसायिक मैफल झाली व या मैफलीनंतरच काणेबुवा मला गुरुवर्य म्हणून लाभले. पुढं सन 1994-95 मध्ये पुण्यात माझं पहिलं गाणं झालं. पंडित प्रमोद मराठे यांनी गांधर्व महाविद्यालयात हे गाणं आयोजिलं होतं. सन 1997 मध्ये ऑक्‍टोबर महिन्यात काणेबुवांचं निधन झालं. त्यानंतर मी पंडित नरेंद्र कणेकर व शुभदाताई पराडकर यांच्याकडंदेखील काही काळ सांगीतिक शिक्षण घेतलं. लग्न झाल्यानंतर मी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर डॉ. विकास कशाळकर यांच्याकडं मी शिकू लागले. आकाशवाणीचे रवींद्र आपटे यांनी माझं एक गाणं आयोजिलं होतं. त्या गाण्याची कॅसेट त्यांनी अण्णांना अर्थात पंडित भीमसेन जोशी यांना ऐकवली. त्यामुळं सन 1998 च्या जानेवारीमध्ये सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची संधी मला पहिल्यांदा मिळाली. या मैफलीनंतर मला जणू आकाश मोकळं झाल्यासारखं वाटलं. कारण, यानंतर ग्वाल्हेरचा 'तानसेन समारोह', चंडीगडचं 'आकाशवाणी संगीतसंमेलन', धारवाडचा 'उस्ताद रहमत खॉंसाहेब महोत्सव' अशा देशभरातल्या विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीतमहोत्सवांमध्ये माझ्या अनेक मैफली झाल्या. 

शिकागो, लंडन, सिंगापूर, मस्कत, बांगलादेश आदी ठिकाणी विदेशांतही माझ्या अनेक मैफली रंगल्या. गोविंद बेडेकरकाका यांच्यामुळं सन 2003 मध्ये 50 व्या सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याचा योग पुन्हा आला. स्वरमहाल खचाखच भरलेला होता. या गाण्यासाठी तबल्यावर माझ्या धाकट्या बहिणीनं (संजीवनी हसबनीस), तर स्वरसंवादिनीवर तिच्या यजमानांनी (श्रीराम हसबनीस) साथसंगत केली होती. 'सवाई'त दोन्ही वेळा मला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली व वन्समोअर मिळाला. या कारणानं अण्णांनी दोन्ही वेळा गायचा वेळ मला वाढवून दिला. अण्णांचा आशीर्वाद माझ्या जीवनात मला खूप मोलाचा आहे. 

बुवांनंतर डॉ. विकास कशाळकर यांनी मला खूप प्रेमानं शिकवलं. माझ्या पुढील सांगीतिक प्रवासात पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडं शिकण्याची माझी इच्छा होती. विकासकाका व तालयोगी पंडित सुरेश तळवलकर गुरुजी यांच्यामुळं हा योगदेखील जुळून आला. सध्या मी त्यांच्याकडंच शिकते आहे. रागाकडं बघण्याचा नवीन दृष्टिकोन त्यांच्यामुळं मला मिळतो आहे. इथं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते व ती ही, की माझ्या सर्व गुरूंना घराणेदार तालीम मिळालेली असल्यानं त्यांनी कधीही आपल्या गाण्यात गिमिक्‍सला स्थान दिलं नाही. या पार्श्वभूमीवर मीदेखील कधी गिमिक्‍सचा अवलंब केला नाही. असं असतानादेखील माझ्या असंख्य मैफिलींमधली एकही मैफल कधी पडलेली नाही. 

काणेबुवांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मी काहीतरी करावं, अशी माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. बेडेकरकाकांच्या मदतीनं 'संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठान' ची स्थापना आम्ही केली. याचा लाभ कित्येक नवोदित कलाकारांना सध्या मिळतो आहे. यात शिष्यवृत्ती, व्यासपीठ-उपलब्धता, ज्येष्ठ गायकांचं मार्गदर्शन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. माझी सांगलीची मैत्रीण विदुला केळकर हिच्यामुळं व गुरू-आज्ञेनं सांगलीत काणेबुवांच्या नावानं गुरुकुल संगीत विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी सध्या तिथं शिकत आहेत. 

माझ्या सांगीतिक कारकीर्दीत सगळ्यात मोठं योगदान आहे ते माझे पती संदीप पाटील यांचं. संगीताशी संबंध नसताना घर, मुलगी (सायली) व स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी मला खंबीर पाठिंबा तर दिलाच; पण सातत्यानं प्रोत्साहनही दिलं. यामुळेच या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा मी प्रयत्न करते आहे... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com