डीवायएसपी पदासाठी विजय चौधरींचे आजपासून प्रशिक्षण

शिवनंदन बाविस्कर
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) - ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींची 3 मेच्या शासन निर्णयानूसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'डीवायएसपी' पदावर नियुक्त करण्यासंदर्भात नियुक्तीपत्र दिले होते. त्यानुसार आजपासून पुणे येथे त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.

विजय यांची 'डीवायएसपी' पदासाठी अकरा महिने प्रशिक्षण प्रक्रिया चालणार आहे. त्यानुसार आज 1 ऑगस्टपासून पुण्याच्या यशदा येथे प्रशिक्षणाला प्रारंभ होत आहे. पुण्यात पहिला एक महिना प्रशिक्षण पार पडेल. त्यानंतर सप्टेंबरपासून नाशिक येथे दहा महिने प्रशिक्षण चालणार आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमा संदर्भात विजय यांना शासनातर्फे माहितीचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते आजपासून प्रशिक्षणासाठी रुजु होणार असल्याचे स्वतः विजय यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

दरम्यान प्रशिक्षणांतर्गत तालिम करता येईल का? यासंदर्भात जाणुन घेतले असता विजय म्हणाले की, प्रशिक्षणा दरम्यान तालमीसाठी वेळ मिळेल का ते माहित नाही. पण मी अधिकार्यांशी विनंती करुन किंवा प्रशिक्षणानंतर मिळालेल्या वेळात तालीम करीत जाईल असे सांगितले. तालमीत खंड न पडू देण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल असेही विजय यांनी सांगितले.