
नागपूर : शहरात कोरोनाने थैमान घातले असून दररोज चाळीस ते पन्नास बाधितांचा मृत्यू होत आहे. यात ऑक्सीजनअभावी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनामृत्यूवर नियंत्रणासाठी विभागीय आयुक्तांकडून शहरापासून अडीचशे किमी लांब असलेल्या मध्यप्रदेशातील भिलाई स्टील प्लांट येथून ऑक्सीजन आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. महापालिकेचे एक हजार ऑक्सिजनच्या बेडचे नियोजन असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
शहरातील कोरोनाबळींची संख्या बाराशेवर पोहोचली. त्यामुळे प्रशासनापुढे बळींची संख्या रोखण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोना मृत्यूवर नियंत्रणासाठी महापालिकेच्या तयारीबाबत ‘सकाळ'सोबत बोलताना अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शहरात एक हजार ऑक्सीजनचे बेड तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
ऑक्सीजचा तुटवडा असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर भिलाई येथील स्टिल प्लांटमधून ऑक्सीजन मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमुद केले. याशिवाय महापालिकेकडे ४० ॲम्बुलन्स असून यात ६० ॲम्बुलन्सची भर घालणार आहे.
यासाठी ६० वाहनांचे ॲम्बुलन्समध्ये रुपांतर करण्यात येणार असून आरटीओकडे परवानगी मागितली असून ती सोमवारपर्यंत मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात १०० बेड उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
आयएएस अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन झोनची जबाबदारी
शहरात चार आयएएस अधिकारी असून प्रत्येकाकडे महापालिकेच्या दोन झोनची जबाबदारी देण्यात येणार आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना जलदगतीने शोधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हायरिस्क रुग्णांची यादी तयारी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांनी चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले.
मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न
सध्या १०० रुग्णांमागे ३.५ असा मृत्यूदर आहे. हा दर शून्यावर आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एका दिवसांत होणाऱ्या मृत्यूचे दररोज आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, झोनल अधिकारी मृत्यूचे कारणे शोधण्यासाठी विश्लेषण करतील. शेवटच्या क्षणी दाखल होणारे रुग्ण, लक्षणे आढळून आल्यापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ आदीवर चिंतन करून मृत्यूदर कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.