सोयाबीन उत्पादकांची सरकारकडून थट्टा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

आधी नोटाबंदी, आता वीज बंदी 
भाजप सरकारने गतवर्षी दिवाळीत जनतेला नोटाबंदीची भेट दिली होती. यावर्षी एेन दिवाळीत वीज बंदीची भेट दिली. शेतकऱ्यांसोबतच सामान्य जनतेचाही या सरकारने कधी विचार केला नाही. सरकारला सामान्यांचे प्रश्‍न हाताळण्यातही अपयश आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. 

अकोला : तीन वर्षांपासून सततच्या नापिकीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत सरकारने केली नाही. त्यातच आता सोयाबीन उत्पादकांचीही सरकारने थट्टा चालविली आहे. हमीभावाने खरेदीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना या सरकारने आर्थिक अडचणी टाकले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे नेते तथा माजीमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेती मालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकारने त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी केली. या पत्रकार परिषदेला माजीराज्यमंत्री तथा राकाँ प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आशा मिरगे, युवक आघाडी विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंदाताई देशमुख, जिल्हाध्यक्ष पद्‍मा अहेर, ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, शैलेंद्र बोदडे, राकाँचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी भाजप सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सर्वच आघाडीवर अपयशी ठरल्याचे सांगितले. सहा महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ सुरू आहे, तो सोडवा, वीज तोडणीबाबत तोडगा काढा, शेती मालाची हमी भावाने खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा, कापसाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बोनस द्या अशी मागणी देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात सरकारने गांभिर्य न दाखविल्यास तालुका व जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

कृषी माल दराच्या जाहीराती फसव्या 
केंद्रात तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कर्जमाफी व कृषी मालाच्या दराबाबत शासनाकडून करण्यात येत असलेल्या जाहीराती फसव्या असल्याचा आरोप माजीमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

राकाँची दिशा ६ व ७ ला ठरणार 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीसोबत सरकार विरोधी धोरण व आंदोलनाची दिशा ६ व ७ नोव्हेंबरला होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात ठरणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

कृषिमंत्री आहेत कुठे? 
शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी या सर्वांपासून कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर लांब आहेत. ते कुठेच दिसत नाही. सरकार आणि कृषी खात्याचा कुठेही संबंध नाही. सरकारनेच तर कृषिमंत्र्यांना लांब राहण्यास सांगितले नाही ना, अशी खोपरखडी अनिल देशमुख यांनी केली. 

आधी नोटाबंदी, आता वीज बंदी 
भाजप सरकारने गतवर्षी दिवाळीत जनतेला नोटाबंदीची भेट दिली होती. यावर्षी एेन दिवाळीत वीज बंदीची भेट दिली. शेतकऱ्यांसोबतच सामान्य जनतेचाही या सरकारने कधी विचार केला नाही. सरकारला सामान्यांचे प्रश्‍न हाताळण्यातही अपयश आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. 

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा 
जिल्ह्यात पैसेवारी ५० पैशांच्या आता आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरवा करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी दिली. 

१९ डिसेंबरला शदर पवार नागपुरात 
राजकारणातील ५० वर्ष पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूर येथे पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवार १९ डिसेंबरला नागपूर येथे येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Web Title: Akola news Anil Deshmukh statement on Soybean price