हिवाळ्यातच पंधरा प्रकल्पांनी गाठला तळ

water
water

अकाेला : यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील माेठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा आहे. पावसाळ्यात पावसाने धाेका दिल्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील ३८ प्रकल्पांपैकी १५ प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तर नऊ प्रकल्पांमध्ये १०, पाचमध्ये १० ते २५, सहामध्ये २५ ते ५०, दाेनमध्ये ५० ते ७५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

यावर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी २१ टक्क्यांनी घटले. अकाेला, बार्शीटाकळी, अकाेट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर तालुका मिळून जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ६९७.२९ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षित असते. परंतु यावर्षी जिल्ह्यात सरासरी केवळ ५५०.९७ मि.मी. पाऊस झाला. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत यावर्षी ७९.०२ मि.मी. कमी पाऊस पडला. म्हणजेच जिल्ह्यात यावर्षी २०.९८ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळीवर खालावली आहे. तर दुसरीकडे अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील माेठ्या जल प्रकल्पात पाणीच साठू शकले नाही. हीच अवस्था मध्यम व लघूजल प्रकल्पांची सुद्धा दिसून येत आहे. पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील ३८ माेठ्या, मध्यम, लघुजल प्रकल्पांमध्ये केवळ १४० दलघमी म्हणजेच ४१.७५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १९.५६ व १३ लघु प्रकल्पात १०.८६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात अमरावती जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याच्या स्थितीत ८१.९५ दलघमी उपयुक्त म्हजणेच १०० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातुर तालुक्यातील दाेन मध्यम प्रकल्पात ३५ तर सात लघु प्रकल्पात २७.५० टक्के, मूर्तिजापूर तालुक्यातील एकामध्यम प्रकल्पात ७.३३ तर लघु प्रकल्पात ५.०८, अकाेट तालुक्यातील पाच लघु प्रकल्पात ३३.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अकाेला तालुक्यातील चार व बाळापूर तालुक्यातील दाेन लघु प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात हिवाळ्याच्या सुरूवातीलाच केवळ ४१.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्रामीण क्षेत्रासह शहरी क्षेत्रात राहणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके
यावर्षी पावसाने दगा दिली. त्याबराेबरच प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी हिवाळ्याच्या सुरूवातीलाच जलप्रकल्पांत पुरेशा जलसाठा नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहणाऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामाेरे जावे लागणार आहे. दूसरीकडे जिल्ह्यातील ४७ गावांत हिवाळ्यातच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने येणाऱ्या काळातील पाणीटंचाईची चाहुल लागली आहे.

जल प्रकल्पातील पाणीसाठ्यावर दृष्टीक्षेप
प्रकल्प स्थिती संख्या
बीएलएसएस (ड्राय) १५
० ते १० टक्के ०९
१० ते २५ टक्के ०५
२५ ते ५० टक्के ०६
५० ते ७५ टक्के ०२

जिल्‍ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे १५ लघु प्रकल्प काेरडे पडले आहेत. वाण धरणा व्यतिरीक्त इतर धरणातील पाणीसाठी अल्प आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा उपयाेग काटकसरिणे करणे आवश्यक आहे.
- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com