पुणे : निसर्गाची जोपासना करीत शेती करायला शिकवणारी, "झाडे लावा झाडे जगवा असा' संदेश देणाऱ्या शेतकी विद्यापीठाचा कारभार मुळा रस्ता परिसरातील निसर्ग व सौंदर्यसृष्टीने नटलेल्या सुमारे पंधरा ते वीस विशाल वृक्षांच्या जिवावर उठला आहे आपल्या भूखंडावर सीमाभिंत बांधण्यासाठी वृक्षांच्या अगदी बाजूने खोदाई करण्यात आल्यामुळे येथील जुनी पंधरा ते वीस वृक्ष जोराचा वारा व पाऊस आल्यास कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या प्रकारावर वाकडेवाडी येथील हरित परिवाराच्या सदस्यांनी आवाज उठवून सीमाभिंतीसाठी केलेली खोदाई पूर्ववत करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वाकडेवाडी येथे पुणे-मुंबई मार्गावरून उजवीकडे कमलनयन बजाज उद्यानापासून कोहिनूर इस्टेटपर्यंत रस्त्याच्या कडेला "महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी' यांचे "अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प प्रायोगिक क्षेत्र' या भूखंडावर निलगिरी, बाभूळ, उंबर आदी वृक्ष आहेत. भूखंडाच्या सीमेजवळ रस्त्याच्या कडेने निलगिरीचे उत्तुंग विशाल वृक्ष असल्यामुळे व शेतीला नदीचा किनारा लाभल्यामुळे या परिसराला निसर्ग सौंदर्य प्राप्त झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी विद्यापीठाने आपल्या भूखंडावर सीमाभिंत बांधण्यासाठी रस्त्याच्या कडेने मोठा खड्डा खणला आहे. हा खड्डा वृक्षांच्या बुंध्याला लागून असल्यामुळे व पदपथाच्या खाली पोकळ जमीन असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली ही पंधरा ते वीस झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. कोणत्याही क्षणी जोराचा वारा, पाऊस आल्यानंतर हे वृक्ष कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच ठिकाणी दोनशे मीटर अंतरावरच मध्यंतरी झालेल्या जोराच्या पावसात एक विशालकाय निलगिरीचे झाड अचानक पडले. एक एक करून इतर झाडेही केलेल्या खड्ड्यामुळे उन्मळून पडतील, याकडे लक्ष वेधून वाकडेवाडी येथील पर्यावरणप्रेमी हरित परिवाराने आवाज उठवला असून, आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून शेवटच्या घटका मोजत असलेल्या वृक्षांना वाचवावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. कृषी विद्यापीठाने केलेली खोदाई लवकरात लवकर पूर्ववत करून वृक्षांची जोपासना करावी, अन्यथा हरित परिवारातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणप्रेमी डॉ. किरण मुथा, तुषार गांधी, साधना शहा, रवींद्र नितनवरे अब्रार काझी, बिलाल काझी आदींनी दिला आहे. ""पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना त्याचे जतन करणे काळाची गरज आहे. मुळा रस्ता येथील झाडे कोणत्याही परिस्थितीत आम्ही जगावणार आहोत. कोणाचीही वाट न पाहता झाडांना खतपाणी घालून त्यांचे जतन करू.'' -रवींद्र नितनवरे, हरित परिवार सदस्य. ""झाडांच्या बाजूने सीमाभिंत बांधण्यासाठी खड्डा केला आहे. झाडाच्या मुळांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, याची दक्षता घेतली असून, भिंतींचे काम पावसामुळे थांबवण्यात आले होते, ते आता पुन्हा सुरू झाले आहे. झाडांची पूर्ण काळजी घेऊ. एकही झाड पडणार नाही याची दक्षता घेऊ.'' -ऋषिकेश म्हसे, संबंधित ठेकेदार, कृषी विद्यापीठ राहुरी