यळगूडच्या विश्‍वास खोतांनी मजूरी सोडून फुलवली रेशीम शेती

यळगूडच्या विश्‍वास खोतांनी मजूरी सोडून फुलवली रेशीम शेती

कोल्हापूर - एमआयडीसीत मोलमजुरी करून महिन्याकाठी मिळणार आठ हजार. या पैशात घरखर्च चालवणे ही कसरत; मात्र २००७ ला मोलमजुरी बंद करून रेशीम शेती सुरू केली आणि बघता बघता सारे आयुष्यच बदलून गेले. ही किमया घडली आहे, यळगूडच्या विश्‍वास सखाराम खोत यांच्या आयुष्यात.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. ए. डी. जाधव यांच्या सल्ल्याने श्री. खोत यांच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्यप्राप्तीचा आकार मिळाला. विशेष म्हणजे श्री. खोत वर्षाकाठी सुमारे दहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न रेशीम शेतीतून मिळवत आहेत. श्री. खोत यांची आठ एकर शेती. ऊस, सोयाबीन, हिरवी मिरची ही त्यातील पिके. घरचा डोलारा मोठा. त्यामुळे शेतीत काबाडकष्ट करून हातात पुरेसा पैसा येत नव्हता. 

दहावी शिकलेल्या खोत यांनी एमआयडीसीत नोकरी मिळवली. महिन्याकाठी आठ हजार रुपये मिळायचे. त्यातून घरखर्च परवडत नसे. यळगूडमध्ये आप्पासाहेब झुंजार यांनी रेशीम शेती सुरू केली. चांगले उत्पन्न मिळते, असे खोत यांच्या कानावर आले. अधिक माहिती घेतल्यानतंर त्यांना डॉ. जाधव यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांना कळाले. त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून रेशीम शेतीचा निर्णय घेतला. 

तीन एकर रेशीम शेती सुरू केली. चाळीस बाय चाळीसचे मोठे शेड उभे केले. आई, पत्नी, भाऊ विठ्ठल यांनी रेशीम शेतीत लक्ष घातले. महिना-दीड महिन्यात हातात एक ते सव्वा लाख रुपये मिळू लागले. खोत कुटुंबीयांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यांनी झपाटून कामास सुरवात केली. वर्षातून पाच ते सहा वेळा रेशीम शेतीतून कोषनिर्मिती सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला, की खोत यांच्याकडे पैसा शिल्लक राहू लागला. घरच्या आर्थिक टंचाईला पूर्णविराम मिळाला. शिलकीचा पैसा कुठे गुंतवायचा, असा प्रश्‍न खोत यांच्यासमोर उभा राहिला. त्यांनी तो जमीन खरेदीत गुंतवला. खरेदी केलेल्या जागेत विहिरी खोदून पाण्याची उपलब्धता केली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रोख साडेचार लाख रुपये देऊन चारचाकी खरेदी केली. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात यंदापासून सुरू झालेल्या एमएस्सी. रेशीमशास्त्र डिप्लोमाला त्यांनी प्रवेश घेतला आहे. 

डॉ. जाधव यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याने रेशीम शेतीत फायदा होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, याची माहिती ते देतात. विद्यापीठाच्या चार भिंतीतले शिक्षण थेट आम्हाला शेतीच्या बांधावर मिळते, ही चांगली गोष्ट आहे.
- विश्‍वास खोत,
शेतकरी.


क्‍युबाच्या प्रकल्पाच्या संचालकाची भेट
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरभराट व्हावी, या उद्देशाने डॉ. जाधव हे शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याबाबत आग्रही आहेत. रेशीम संचालनालयात ते जिल्हा रेशीम अधिकारी होते. ते २०११ ला विद्यापीठात रुजू झाले. ते क्‍युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार असून, त्यांनी क्‍युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाच्या संचालक डी. थमिला, उपसंचालक डॉ. अदिती यांनी डिसेंबर २०१४ ला यळगूड भेट घडवून आणली. त्याचबरोबर केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. व्ही. शिवप्रसाद, केंद्रीय रेशीम मंडळाचे संचालक डॉ. एस. बी. दंडीन, म्हैसूर विद्यापीठाच्या रेशीम विभागाचे डॉ. एम. सुब्रमण्यम यांनादेखील यळगूडमधील रेशीम प्रकल्प दाखवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com