esakal | Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas-bule

शेळीपालनातून आर्थिक मिळकत होऊ लागल्याने बुळे दांपत्याने शेती विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज भासू लागली. यासाठी सुमारे तीन लाखांची गरज होती.

Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...

sakal_logo
By
गणेश कोरे

जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी गावातील ललिता रामदास बुळे यांनी नऊ वर्षांपूर्वी एका शेळीपासून पूरक उद्योगाला सुरुवात केली.आज त्यांच्याकडे १५० शेळ्या आहेत. शेळीपालनाच्या बरोबरीने लेंडी खत, गांडूळ खतनिर्मितीतून बुळे यांनी आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे.

जळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) गावशिवारामध्ये ललिता आणि रामदास बुळे हे दांपत्य एक एकर पाच गुंठे क्षेत्रात पारंपरिक शेती करत होते. याच दरम्यान लुपीन फाउंडेशन संस्थेचा वाडी प्रकल्प गावामध्ये सुरू झाला होता. या प्रकल्पाचे तालुका समन्वयक नाजिम पठाण यांच्या समन्वयातून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यात ललिता आणि रामदास सहभागी झाले. या अभ्यास दौऱ्यांमध्ये विविध संशोधन संस्था तसेच उरुळीकांचन येथील बाएफ, तसेच फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेतील शेळीपालन प्रकल्पाचा समावेश होता. या दौऱ्यानंतर आपल्या शेतीमध्ये शेळीपालन व्यवसाय करू शकतो, याचा आत्मविश्‍वास ललिता बुळे यांना आला. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आळेफाटा येथील एका शेळीपालन प्रकल्पातून सात हजाराला कोकण कन्याळ जातीची शेळी खरेदी केली. या काळात आळेफाटा बाजारात दहा हजार रुपयांना म्हैस मिळत होती. पण शेळी विकत आणल्याने परिसरातील लोकांनी त्यांना नावे ठेवली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत ललिताताईंनी शेळीचे चांगले संगोपन केले. दीड वर्षात या शेळीपासून झालेल्या बोकडाची त्यांनी ठाणे जिल्ह्यातील म्हसा (ता. मुरबाड) येथील प्रसिद्ध यात्रेत १५ हजार रुपयांना विक्री केली. या दरम्यान लुपीन फाउंडेशनतर्फे सिरोही आणि सोजद जातीच्या पाच शेळ्या आणि एक बोकड देण्यात आला. यामध्ये १० हजार रुपये लाभार्थी हिस्सा आणि ३५ हजार रुपये लुपीन फाउंडेशनद्वारे देण्यात आले.

हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ

शेळीपालनातून  वाढला आत्मविश्‍वास 
पहिल्या कोकण कन्याळ शेळीपासून झालेल्या एका बोकडाची विक्री आणि तयार झालेल्या तीन शेळ्या, त्यानंतर लुपीनने दिलेल्या ५ शेळ्या आणि एक बोकड अशी बुळे यांच्या गोठ्यात वाढ झाली. या शेळ्यांना गायरानावरच चरायला सोडले जायचे. तीन वर्षांत ललिताताईंकडे ३५ शेळ्या झाल्या. त्यामुळे मोठ्या गोठ्याची गरज भासू लागली. ललिताताईंचे पती रामदास यांनी घराशेजारी टाकाऊ वस्तूंपासून शेळ्यासाठी गोठा उभारला. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी गोठ्यामध्ये पाच फूट उंचीवर फळ्यांचा फलाट तयार केला. रात्रीच्या वेळी शेळ्या फलाटावर राहिल्याने थंडी आणि जोराच्या पावसापासून संरक्षण होते. आजाराचे प्रमाण कमी राहते. सध्या त्यांच्या गोठ्यात १३० शेळ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोजद, सिरोही, उस्मानाबादी, जमनापारी, बीटल, कोकण कन्याळ आणि बेरारी जातीच्या शेळ्यांचा समावेश आहे.

आरोग्य व्यवस्थापन  
शेळ्यांना वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, बुळकांडी, घटसर्प आजार प्रतिबंधात्मक लसीकरण.
स्थानिक पशुतज्ज्ञांकडून लसीकरण. 
रामदास आणि ललिताताईंनी पशू उपचारासंबंधी प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याने ते देखील शेळ्यांना विविध आजारांवर प्रथमोपचार करतात.

हेही वाचा : उसाच्या रसापासून इथेनॉल;साखरेपेक्षा मिळतोय अधिक दर 

शेतीला मधमाशी पालनाची जोड
लुपीन फाऊंडेशनने रामदास बुळे यांच्यासह तीस आदिवासी तरुणांचा मधमाशीपालनाचा गट तयार केला आहे. गटाचे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यांना दीड लाखांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वर्षी प्रत्येकाला पाच मधमाशी पेट्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मध संकलन आणि विक्रीतून गटाला उत्पन्नाचे साधन तयार होणार असल्याची माहिती लुपीन संस्थेचे पुणे जिल्ह्याचे प्रकल्प प्रमुख व्यंकटेश शेटे यांनी दिली.

शेती विकासावर भर
शेळीपालनातून आर्थिक मिळकत होऊ लागल्याने बुळे दांपत्याने शेती विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज भासू लागली. यासाठी सुमारे तीन लाखांची गरज होती. ही गरज भागवण्यासाठी बुळे यांनी या वर्षी ३५ शेळ्यांची सरासरी दहा हजार रुपये दराने विक्री करत तीन लाख रुपये जमविले. 

आणखी वाचा : संत्र्याची थेट विक्री करून शेतकऱ्याने कमावले 2 लाखाहून अधिक उत्पन्न

शेळ्यांची लेंडी आणि मूत्राचा वापर जमीन सुपीकतेसाठी केला जातो.बुळे यांनी एक एकरामध्ये अतिघन पद्धतीने केसर आंबा कलमांची लागवड केली आहे. अर्ध्या एकरावर चारा पिकांची लागवड असते. शेतामध्ये कूपनलिका खोदली आहे.  

वर्षभरात १५० शेळ्यांपासून सुमारे पाच ट्रक लेंडी खताची निर्मिती होते. या खत विक्रीतून सुमारे एक लाखाची मिळकत होते. याचबरोबरीने ते गांडूळ खत तयार करतात. 

शेळी आहाराचे नियोजन
ललिताताईंचा शेळीपालन प्रकल्प अर्धबंदिस्त आहे. दिवसभर शेळ्या माळरानावर चरायला नेल्या जातात. जळवंडी परिसर धरणक्षेत्रालगत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत डोंगरात चारा उपलब्ध असतो. डिसेंबरनंतर एक एकरातील मधील अर्ध्या भागात मका आणि इतर चारा पिकांची चक्राकार पद्धतीने लागवड केली जाते. शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासह दळलेला मका, गहू, उडीद चुरा यांचा खुराक दिला जातो. खाद्यात काही वेळा हिरड्याचा पाला दिला जातो. हा पाला औषधी असल्याने शेळ्यांना जंत होत नाहीत. त्यामुळे वजनात वाढ होत असल्याचा ललिताताईंचा अनुभव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जत्रेमध्ये बोकडांची विक्री 
अनेक शेळीपालक बकरी ईदचे नियोजन करून शेळी, बोकडांचे खास पालनपोषण करतात. मात्र ललिता आणि रामदास बुळे हे जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसाठी बोकड विक्रीचे नियोजन करतात. उन्हाळ्यात परिसरातील सुमारे १५ ते २० गावांमध्ये विविध जत्रा असतात. यामुळे बुळे यांना स्थानिक पातळीवर बोकडांची मोठी मागणी असते. गेल्या वर्षी त्यांनी २७ बोकड स्थानिक यात्रा, जत्रांसाठी लोकांना विकले. यातील काही बोकडांचे वजन ३० ते ५० किलोपर्यंत होते. एका बोकडाची वजनानुसार सरासरी किंमत ९ ते १८ हजार रुपये होती. २७ बोकडांच्या विक्रीतून सुमारे दोन लाखांची उलाढाल झाली. बुळे ३०० रुपये किलो दराने शेळी, बोकडाची विक्री करतात. 

 ललिता बुळे, ९३०७८४८४९१

loading image
go to top