सेवानिवृत्तीनंतर शेतीत नंदनवन फुलवण्याचा ध्यास

गोपाल हागे
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरचा काळ जीवन आरामदायी व्यतीत करण्याचा असतो.  वाशीम येथील आनंदराव पिंजरकरही सेवानिवृत्त झाले. पण मनात शेतीची आवड खोलवर रूतून बसलेली. मग आपली नऊ एकर पडीक जमीन कसायली घेतली. त्याच क्षेत्रावर जिद्दीने सहा वर्षांत ॲपलबेर, गुलाब, डाळिंब, केशर आंबा अादींच्या विविधतेतून नंदनवन फुलवले. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि सकारात्मक वृत्तीचा आदर्शच त्यांनी उभा केला आहे.

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरचा काळ जीवन आरामदायी व्यतीत करण्याचा असतो.  वाशीम येथील आनंदराव पिंजरकरही सेवानिवृत्त झाले. पण मनात शेतीची आवड खोलवर रूतून बसलेली. मग आपली नऊ एकर पडीक जमीन कसायली घेतली. त्याच क्षेत्रावर जिद्दीने सहा वर्षांत ॲपलबेर, गुलाब, डाळिंब, केशर आंबा अादींच्या विविधतेतून नंदनवन फुलवले. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि सकारात्मक वृत्तीचा आदर्शच त्यांनी उभा केला आहे.

वाशीम येथील आनंदराव पिंजरकर सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. सन २०१३ मध्ये बुलडाणा येथे विभागीय भांडारपाल म्हणून ते सेवानिवृत्त झाले. वाशीम जिल्ह्यात त्यांचे दोन भाऊ राहतात. वाशीम शहराला लागून पिंजरकर यांची जमीन आहे. नोकरीतील व्यस्त कामांमुळे ती पडीकच राहिली. पण, पिंजरकर यांना शेतीचा पूर्वानुभव होता. आवडही होती. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या काळात पूर्ण लक्ष शेतीतच द्यायचे ठरवले. त्यानुसार काळी माती टाकून संपूर्ण शेतीला तारांचे कुंपण केले. 

पिकांच्या विविधतेवर भर 
पारंपरिक पिकांपेक्षा शेतीत नवे काही करायचे ठरवले होते. त्यानुसार पीकपद्धतीचा आराखडा तयार केला. त्यानुसार डाळिंब (दोन एकर), आंबा (३५ गुंठे), गुलाब (सुमारे ५ गुंठे), ॲपल बेर (३० गुंठे), शेवगा ( ७० झाडे बांधावर) अशा विविध फळ-फूल पिकांची लागवड केली. 

पिकांची विविधता 
बांधावर असलेल्या शेवग्यानेही मागील वर्षी किलोला ५० ते ६० रुपये दराने ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न दिले आहे. केशर आंब्याच्या १२ बाय १२ फुटांवर असलेल्या बागेतूनही लवकरच उत्पादन सुरू होणार आहे. चांगले व्यवस्थापन करीत असल्याने झाडांची योग्य वाढ झाली आहे. या बागेत आंतरपिकेही घेतली जातात. यातील भुईमुगाच्या काढणीचे काम सुरू होणार असून ३५ गुंठ्यात सुमारे १० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. सीताफळ, द्राक्ष, चिकू, करवंद आदींचीही लागवड केली अाहे. आगामी काळात सर्वच झाडांपासून मिळकत सुरू होईल. पारंपरिक शेतीत सोयाबीन, तूर आहे. 
दोन विहिरी व ठिबक या आधारे संपूर्ण शेतीला पाणी दिले जाते. सध्या पुरेसे पाणी उपलब्ध आहे. तरीही गरज भासल्यास शेतापासून काही अंतरावर पाण्याच्या उपलब्धतेसाठी क्षेत्र घेतले आहे. तेथे विहिरी खोदून पाणी उपलब्ध करण्याचा विचार आहे. 

प्रत्येक गोष्टीची नोंद 
शेतीत यशस्वी व्हायचे असेल तर त्याकडे व्यावसायिक पद्धतीने बघावे लागेल. हाच दृष्टीकोन पिंजरकर यांनी स्वतःसमोर ठेवला. लागवड केलेल्या प्रत्येक पिकाची पहिल्या दिवसापासूनची नोंद त्यांनी वहीत केली आहे. खते, फवारण्या, मिळालेले उत्पादन आदी सर्व बाबींचा सारा तपशील तारीखनिहाय त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. कोणताही संदर्भ लागल्यास त्यांना तो त्वरित मिळतो. 

पिंजरकर यांनी शेतातच घर उभारले आहे. कुटुंबीयांसमवेत ते येथेच राहतात. अगदी सकाळीच त्यांचा दिनक्रम शेतातील कामांमधूनच सुरू होतो. शेतात चौफेर फिरून कुठले काम करायचे, काय समस्या आहे हे कळते. त्यानुसार व्यवस्थापन केले जाते. अगदी सायंकाळपर्यंत ते शेतीकामांमध्येच व्यस्त असतात. गरजेनुसार बाहेरून मजूर मागवले जातात. कामांमुळे स्वास्थही चांगले राहत असून तेच खरे औषध असल्याचे ते म्हणतात.

गुलाबातून ताजे उत्पन्न 
सहा बाय पाच फुटांवर गुलाबाची २५० झाडे लावली होती. मागणीनुसार पुरवठा अपुरा पडू लागल्याने ५० नव्या झाडांची लागवड वाढवली आहे. सध्या दररोज ३०० ते ४०० फुलांचे उत्पादन मिळते. वाशीम शहरात एका फूल विक्रेत्यासोबत तीन रुपये प्रतिनग असा दर निश्चित करून घेतला आहे. त्यामुळे वेगळी बाजारपेठ शोधण्याची गरज भासली नाही. या पिकातून दररोज ताजे उत्पन्न हाती येते. त्यातून दैनंदिन खर्चाला मदत होते.  

ॲपलबेरचे उत्पादन 
या पिकाची १२ बाय ९ फूट अंतरावर लागवड केली आहे. त्यातून आत्तापर्यंत दोन वर्षे उत्पादन घेतले आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सरासरी ३० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. यंदाच्या तिसऱ्या वर्षी झाडांवर भरपूर फळे लगडली असून चांगले उत्पन्न हाती येईल असे पिंजरकर म्हणाले.

- आनंदराव पिंजरकर, ७०३८८३४००८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Anandrao Pinjarkar Rose Success