दुर्गम गोंदियात एकात्‍मिक शेतीचा आदर्श

Agriculture
Agriculture

भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा प्रेरणास्राेत तयार केला आहे.

गोंदिया जिल्हा म्हणजे भाताचे मुख्य पीक. दुर्गम अशीच जिल्ह्याची ओळख आहे. शेतीच्या अनुषंगाने आर्थिक विकासाला जिल्ह्यात अद्याप बराच वाव आहे. अनेक शेतकरी विविध प्रयोगांद्वारे जिल्ह्यात नवा उत्साह तयार करताना दिसताहेत. तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील टलूराम पटले हे त्यापैकीच एक. 

दुग्धव्यवसायाला दिला आकार 
सन २००३ मध्ये एका म्हशीपासून दुग्धव्यवसायास सुरवात केली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. पैदास व खरेदी याद्वारे जनावरांची संख्या आज ५१ पर्यंत नेण्यास त्यांना यश आले आहे. गावरानसह मुऱ्हा, जाफराबादी म्हशींचा त्यात समावेश आहे. रोजचे दूध संकलन सुमारे ७० ते ८० लिटरच्या घरात आहे. विक्री पहेला येथील एका डेअरीला होते. फॅटनुसार १८ पासून ते २८ रुपये प्रतिलिटर दर मिळतो. पटले सांगतात, की दुग्धव्यवसाय खर्चिक झाला आहे. दरही मनासारखे नाहीत. त्यामुळे नफा म्हणाल तर सीमेरेषेवरच आहे. जनावरांच्या दरवर्षीच्या विक्रीमुळे हा व्यवसाय परवडतो. विक्रीतून वर्षाला सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

प्रक्रियेवर भर
दुधापासून दही, तूप आदी पदार्थ तयार करून व्यवसायातील नफा वाढविण्याचा प्रयत्न होतो. महिन्याला दहा किलो तूप आणि मागणीनुसार दही बनविले जाते. तुपाची विक्री ६०० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे होते. तुपासाठी गावातच ग्राहक तयार आहेत.  

चाऱ्याची सोय
जनावरांची संख्या पाहता दोन 
एकर क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव ठेवले आहे. यात मका, ज्वारी, बरसीम,  बाजरा आदींची लागवड केली जाते. 
धान काढणीनंतर मिळणारे तणसदेखील चारा म्हणून वर्षभर उपयोगात 
आणले जाते. 

ट्रॅक्‍टर्स व भाडेतत्त्‍वावर पुरवठा 
टलूराम यांनी यांत्रिकीकरणावरही भर दिला आहे. सन १९९२ मध्ये त्यांनी पहिला ट्रॅक्‍टर घेतला. आज त्यांच्याकडे तीन ट्रॅक्टर्स आहेत. त्याचबरोबर जमीन सपाटीकरण, मशागत आदींची अवजारे त्यांनी घेतली आहेत. ट्रॅक्टर व अवजारे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर वापरण्यास दिली जातात. टलूराम यांचा मुलगा त्याची जबाबदारी सांभाळतो. त्यातून अतिरिक्‍त उत्पन्नाचा पर्याय शोधला आहे. 

टलुराम यांचा पुढाकार 
सुमारे १२०० लोकवस्तीच्या पांजरा गावात दुधाळ जनावरांची मोठी संख्या आहे. गावात दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी टलूराम यांनी पुढाकार घेतला. गावातील अनेकांना स्वस्तात म्हशी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता शेतीचा विस्तार केल्याचे टलूराम अभिमानाने सांगतात. 

गरजेनुसार यंत्रे विकसित केली
टलूराम यांचा मुलगा देवानंद यांनी कुशल बुद्धीचा वापर करून काही यंत्रेही तयार केली आहेत. गावालगत नाला आणि तलाव आहे. दोन्ही स्राेत शेतापासून हजार फूट अंतरावर आहेत. ट्रॅक्‍टरचलित पंपाचा याकामी वापर होतो. ट्रॅक्‍टरच्या पीटीओ शाप्टद्वारे पाणी खेचले जाते. हे यंत्र तयार ५० हजार रुपयांचा खर्च आला. एकाचवेळी दोन पंप चालतात अशी त्याची रचना आहे.

उपद्रवी जनावरांना शेतापासून दूर घालवण्यासाठी प्लॅस्‍टिक पाइप, लायटर यांचा वापर करून यंत्र तयार केले आहे. या यंत्रातून विशिष्ट असा मोठा आवाज बाहेर पडतो. त्याला जनावरे घाबरतात व पळून जातात. 

शेणखत व गोबरगॅस यंत्रणा
दरवर्षी सुमारे ५० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. शेणावर प्रक्रिया करीत ते कुजवून त्याचे कंपोस्ट तयार करण्यावर भर दिला आहे. टलूराम यांचे वडील बळीराम यांनी १९८६ मध्ये बायोगॅस यंत्रणा उभारली होती. त्या वेळी पैशांची सोय नसल्याने बॅंकेकडून कर्ज घेण्यात आले होते. हे युनिट टलूराम यांनी आजही यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबात आठ व्यक्‍ती आणि चार नोकरांचा समावेश आहे. या सर्वांचा स्वयंपाक याच जैविक इंधनावरच होतो. त्यामुळे किमान ३० वर्षांत सिलिंडरकरिता नोंदणीच करण्याची गरज पडली नसल्याचे पटले यांनी सांगितले. या कुटुंबाची प्रेरणा घेत पूर्वी गावात अशा २६ युनिटसची उभारणी झाली. परंतु आज त्यातील सुमारे दोनच युनिटस सुरू असावेत.

जनावरांपासून दररोज शंभर लिटरपर्यंत मूत्र मिळते. गावातील शेतकऱ्यांना ते निशुल्क दिले जाते. सकाळ व संध्याकाळ असे दोन्ही वेळच्या गोमूत्र संकलनासाठी स्वतंत्र टॅंक तयार करण्यात आले आहेत.

- टलूराम पटले, ९३२५५५४७०६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com