खानदेश, मराठवाडा, विदर्भात ‘पूर्वमोसमी’चा तडाखा

टीम ॲग्रोवन
Thursday, 19 March 2020

‘अस्मानी’चा हंगामा... 

  • काढणीस आलेले ज्वारी, गहू, हरभरा भुईसपाट
  • खानदेशात वादळाने केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त
  • गारपिटीने द्राक्षाचे घड गळाले, आंबा पिकाला फटका  
  • शिरपूर येथे शेड अंगावर पडून एकाचा मृत्यू 
  • बीडमध्ये वीज पडून गाय-बैल मृत्युमुखी 
  • काढणी केलेला शेतीमाल पालापाचोळ्यासारखा उडाला

वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस, तुफान गारपिटीचा पिकांसह फळबागांना दणका
पुणे - राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भात पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला आहे. वादळी वारे, गारपिटीसह आलेल्या पावसाने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिके भुईसपाट केली. केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त केल्या; तर द्राक्ष बागा, आंबा बागांनाही तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे काढून ठेवलेली रब्बी पिके अक्षरश: पालापाचोळ्यासारखी उडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खानदेशातील धुळे, जळगाव, आणि नंदूरबार जिल्ह्यात मंगळवारी (ता. १७) वादळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे आडोशाला उभे राहिलेले शेड अंगावर पडून राजेंद्र माळी यांचा मृत्यू झाला. तर आणखी आठ जण जखमी आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी-तळेगाव येथे झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले, रावेर, तोंडापूर, अमळनेर, चोपडा, भुसावळ येथे अचानक पावसाने हजेरी लावली, धुळे जिल्ह्यात कापडणे, शिरपूर, दोंडाईचा येथे तर नंदूरबार जिल्ह्यातील न्याहली परिसरात पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने काढणीस आलेला गहू, हरभरा भुईसपाट झाला, केळी पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या, काढणी करून ठेवलेला मालही पालापाचोळ्यासारखा उडून गेला.

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मंगळवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतामध्ये सोंगून ठेवलेल्या तसेच उभ्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० मंडळांत हजेरी लावणाऱ्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी, हरभऱ्यासह आंबा, द्राक्ष, शेवगा आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील अंकुश नवले या शेतकऱ्याचे गंगावाडी धोंडराई परिसरात शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेले बैल व गाय अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. जालना तालुक्‍यातील कडवंची शिवारात गारपीट झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, आंब्याला आलेला मोहोर व कडवंची शिवारातील द्राक्षासह डाळिंब पिकांचेही नुकसान झाले.

पूर्व विदर्भात सर्वदूर गारपीट आणि वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान भिजल्याने त्याची प्रत खालावली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १७) दुपारनंतर पावसाने थैमान घातले.

वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचा पालापाचोळा झाला. खामगाव तालुक्यात गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पिकाची पात गारपिटीने तुटून पडली. केळी व मका पिकाची पाने फाटली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture loss by hillstrom in khandesh marathwada and vidarbha